Israel Iran War – युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होणार परिणाम; चीन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

अमेरिका, इस्रायल इराण युद्धामुळे आखाती देशातील वाढत्या तणावामुळे हिंदुस्थान, चीनसह आशियातील अनेक देशांवर तेल संकट ओढवण्याची शक्यता आहे. तसेच तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान, चीन आणि आशियातील अनेक देश इराण आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल आयात करतो. हा मार्ग इराण नियंत्रित करतो आणि आता इराणने स्पष्टपणे सांगितले आहे की, या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही तेल टँकर किंवा जहाजावर हल्ला केला जाईल. या मार्गावर इराणने अमेरिकेसाठी आधीच बंदी घातली होती. आता इराणने हा मार्गच बंद केल्याने तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

इराण-इस्रायल युद्धादरम्यान, चीनने कच्च्या तेलाच्या संदर्भात एक मोठे विधान केले आहे, ज्यामुळे चीन कच्च्या तेलाच्या संदर्भात काही मोठी पावले उचलू शकतो असे संकेत मिळत आहेत. सौदी अरेबियाची रिफायनरी देखील सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. यामुळे चीनच्या तेल आयातीवर संकट निर्माण झाले आहे. तथापि, चीनकडे सहा महिन्यांचा कच्च्या तेलाचा साठा आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचे निमित्त वापरून चीनच्या तेल आयातीत अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे आता अमेरिकेची अडचण होईल, असा निर्णय चीन घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चीन लवकरच त्यांच्या ऊर्जा आयात आणि साठ्यांबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकतो. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इशारा दिला आहे की, ते त्यांच्या ऊर्जा सुरक्षेचा आढावा घेत आहेत आणि त्यांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत. चीनच्या या विधानावरून असे दिसून येते की भविष्यात चीनच्या तेल आयातीत अडथळा आणणाऱ्या कोणत्याही देशावर किंवा मार्गावर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे आता चीन नेमका काय निर्णय घेणार, याबाबत चर्चा होत आहेत.

चीनने आखाती देशातील तणाव आणि युद्ध रोखण्याचे आवाहन केले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले की होर्मुझची सामुद्रधुनी आणि त्याच्या आसपासचे सागरी मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांनी सर्व पक्षांना संघर्ष त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. चीनने म्हटले की तणाव आणखी वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल. सर्व पक्षांनी संवाद आणि राजनैतिक मार्गांनी तोडगा काढावा, तणाव वाढू नये.

युद्ध सुरू झाल्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सोमवारी तेलाच्या किमती १० टक्क्यांहून अधिक वाढल्या होत्या, परंतु त्यानंतर त्या पुन्हा सावरल्या आहेत, ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या, तेलाच्या किमती २.५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत, जे प्रति बॅरल $८० पर्यंत पोहोचले आहेत. तर युरोपियन नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये काल ४५ टक्क्यांनी वाढ झाली.

Comments are closed.