Iran US Israel War – फक्त 40 दिवसांचा इंधन साठा शिल्लक, ‘या’ देशात राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी लागू, हिंदुस्थानमधील परिस्थिती काय?
इराण, इस्रायल आणि अमेरिकेत मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. आखातातील युद्धामुळे तेल आणि गॅस टंचाई निर्माण झाली असून याची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर फिलिपिन्सने राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी लागू केली आहे. ऊर्जा आणीबाणी करणारा फिलिपिन्स पहिला देश ठरला असून जगात इंधन पुरवठ्याचे संकटही गंभीर असल्याचेही फिलिपिन्सने मान्य केले आहे.
इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत आखातातील देशांच्या तेल रिफायनरी आणि गॅस प्लांटवर हल्ले चढवले. तसेच इंधनाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनीही बंद केली. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अनेक व्यापारी जहाजं अडकून पडली आहेत. यामुळे जागतिक बाजारात तेल आणि गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी मंगळवारी रात्री उशिरा एक आदेश जारी करत देशात राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी लागू केली. देशाची ऊर्जा स्थिरता, आर्थिक उलाढाल आणि जीवनावश्यक सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
फिलिपिन्स हा देश आपल्या गरजेच्या जवळपास 98 टक्के तेल आयात करतो. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल वाहतूक मंदावली आहे. 20 मार्चच्या आकडेवारीनुसार फिलिपिन्सकडे फक्त 45 दिवसांचा इंधन साठा शिल्लक आहे. आगामी काळामध्ये युद्ध लांबले आणि इंधन पुरवठ्यातील अडथळे कायम राहिले तर देशात मोठी टंचाई होऊ शकते. त्यामुळे फिलिपिन्सने ऊर्जा आणीबाणी लागू केली आहे. 2020 च्या कोविड-19 संकटानंतर फिलिपिन्समध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची देशव्यापी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
इंधनाच्या टंचाईचा फटका विमान वाहतुकीलाही बसण्याची शक्यता असल्याचे संकेत फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींनी दिले. इंधनाच्या कमतरतेमुळे विमाने उड्डाणं घेऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. तसेच ‘फिलिपिन्स एअरलाईन्स’ने देखील त्यांच्या केवळ जूनपर्यंतचा इंधन साठा सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपतींनी इंधन, अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे योग्य प्रकारे वितरण सुनिश्चित करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. तसेच, पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी इंधन आणि पेट्रोलियम उत्पादनांची थेट खरेदी करण्याचे अधिकारही सरकारला देण्यात आले आहेत. एका वर्षांसाठी ही आणीबाणी लागू असणार असून राष्ट्रपतींना ही आणीबाणी उठवण्याचा अधिकार असणार आहे.
हिंदुस्थानातील परिस्थिती काय?
देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या कमतरतेबाबत पसरणाऱ्या अफवांच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी स्थिती पूर्णपणे सामान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘भारत पेट्रोलियम’ आणि ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’ यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. देशभरात कुठेही इंधनाची टंचाई नाही. ग्राहकांनी अफवांना बळी पडून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये आणि सामान्यपणे इंधनाचा वापर कराव, असे तेल कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच देशातील सर्व रिफायनरीज उच्च क्षमतेने काम करत असून इंधनाचा पुरेसा साठा आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.