Iran War – कुवैत, बहरीनमध्ये पुन्हा हल्ले सुरू; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला
मध्य पूर्वेतील युद्धाला आज 26 दिवस झाले असून, परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झालेली आहे. यूएई संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली आहे की, बहरीन येथे इराणच्या हल्ल्यात यूएई सैन्याशी संबंधित मोरोक्कोचा एक नागरीक ठार झाला आहे. दरम्यान कुवैतमधील वीज वितरण यंत्रणा हवाई संरक्षणातील स्फोटांमुळे बाधित झाली आहे. त्यामुळे देशातील काही भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता.
कुवेत इंटरनॅशनल एअरपोर्टवर इंधन टाकीवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आग लागली, मात्र कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. आपत्कालीन सेवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत यावेळी आग आटोक्यात आणली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, युद्ध संपवण्यासाठी अमेरिका इराणसोबत वाटाघाटी करत आहे. इराणने कोणत्याही चर्चेचे वृत्त फेटाळले आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले करण्यात येत आहेत. मंगळवारी रात्री (२४ मार्च) इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने इस्रायलवर डझनभर क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, लेबनीज अतिरेक्यांच्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलमधील एका महिलेचा मृत्यू झाला. युद्धादरम्यान लेबनीज हल्ल्यामुळे इस्रायलमधील हा पहिला मृत्यू आहे.
वृत्तानुसार, इराणने इस्रायल व्यतिरिक्त कुवेत, जॉर्डन आणि बहरीनवरही क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने इस्रायल तसेच कुवेत, जॉर्डन आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याची घोषणा केली.
बहरीनमधील एका कंपनीला इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आग लागली होती. बहरीनच्या नागरी संरक्षण दलाने ही आग विझवली असून, आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. कुवेत सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या हवाई संरक्षण प्रणालीने शत्रूच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
Comments are closed.