इराण युद्धामुळे दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्राला फटका, अनेक ग्राहकांनी व्यवहार पुढे ढकलले; गुंतवणूकदारांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये साधारणतः गेल्या तीन वर्षांपासून मोठी तेजी होती. मात्र, इराणवर हल्ले झाल्यानंतर इराणने दुबईला लक्ष्य केले. इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे अरब देशांमधील रिअल इस्टेट क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. युद्धाच्या पार्श्चभूमीवर गुंतवणूकदारांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्यामुळे दुबईसारख्या शहरांमधील रिअल इस्टेटचे व्यवहार ठप्प पडले आहेत.
इराण युद्धानंतर दुबई तसेच संयुक्त अरब अमिरातीतील मोठय़ा शहरांमधील रिअल इस्टेटच्या व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. या क्षेत्रातील आघाडीच्या ब्रोकर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही खरेदीदारांनी व्यवहारातून माघार घेतली आहे. काही ग्राहकांनी व्यवहार तात्पुरते थांबवले आहेत. काहींनी करारांवरील स्वाक्षऱ्या पुढे ढकलल्या आहेत. याशिवाय दुबईमधील महत्त्वाच्या ठिकाणी साईट व्हिजिटदेखील कमी झाल्याचे ब्रोकर्सचे म्हणणे आहे.
मोठा वाटा हिंदुस्थानी तसेच अनिवासी नागरिकांचा
दुबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेत हिंदुस्थानी नागरिक तसेच अनिवासी हिंदुस्थानींचा २५ ते 30 टक्के वाटा आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे खरेदीदारांच्या मानसिकतेवर भावनिक परिणाम झाला आहे. जागतिक आणि प्रादेशिक अस्थिरतेचा व्यवहारांवर परिणाम झाला आहे. संघर्ष निवळत नाही तोपर्यंत गुंतवणूकदार सावध राहूनच पावले उचलतील. फक्त, याचा फटका दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्रावर होईल, असे दलाल म्हटले आहे.
Comments are closed.