इराण युद्ध पुन्हा भडकण्याची भीती, अमेरिका कोणत्याही कराराचे पालन करत नाही; इराणच्या अधिकाऱ्यांचा दावा
अमेरिकेसोबत पुन्हा युद्ध सुरू होऊ शकते, अशी शक्यता इराणने वर्तविली आहे. अमेरिका कोणतेच आश्वासन पाळत नाही. अमेरिकेने कोणतेही चुकीचे पाऊल उचलल्यास इराण चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मोहम्मद जाफर असदी यांनी दिला आहे. दरम्यान, इराणने चर्चेसाठी नवा प्रस्ताव दिला आहे. सर्वप्रथम होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, त्यानंतरच अण्वस्त्राबाबत चर्चा होईल, असे इराणने म्हटले आहे.
अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येणाऱया विरोधाभासी वक्तव्यांबाबत असदी म्हणाले की, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणारी वक्तव्ये केवळ दिखावा असून माध्यमांची लक्ष वेधणारी असतात. कच्च्या तेलाचे दर कमी होण्यापासून रोखणे आणि स्वतः निर्माण केलेल्या परिस्थितीतून बाहेर पडणे, हाच त्याचा हेतू आहे. अमेरिका कराराचे पालन करत नाही. त्यामुळे पुन्हा युद्ध सुरू होऊ शकते. मात्र इराणचे सैन्य पूर्णपणे सज्ज असून अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असे ते म्हणाले.
48 जहाजांनी होर्मुझजवळ मार्ग बदलला
अमेरिकेने 13 एप्रिलपासून इराणच्या सागरी व्यापारावर लक्ष्य करत होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली आहे. तेव्हापासून 48 जहाजांना अमेरिकेने दुसरीकडे वळविले आहे. यामुळे जगभरातील इंधन पुरवठय़ावर मोठा परिणाम झाला आहे.
चीनने अमेरिकेचे निर्बंध झुगारले
अमेरिकेने चीनच्या तेल कंपन्यांवर लावलेले निर्बंध चीनने झुगारले आहेत. इराणकडून कच्चे तेल खरेदी करणाऱया कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले होते. ते लागू होऊ देऊ नका, असे आदेश चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने दिले आहेत.
काय आहे इराणचा नवा प्रस्ताव?
इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर चर्चा नंतर ठेवल्यास वाटाघाटी करणे सोपे आहे. आधी अमेरिकेने नाकाबंदी हटवावी आणि होर्मुझचा मार्ग खुला करावा. अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर नंतर चर्चा होईल. या भूमिकेवर करार झाल्यास युद्ध थांबेल. त्यानंतर इराणदेखील सागरी मार्ग खुला करेल, असे हा अधिकारी म्हणाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याचे वृत्त आहे.
Comments are closed.