हर्षित राणाला संधी, तर कुलदीप यादव बाहेर! इरफान पठानने पहिल्या टी-20साठी जाहीर केली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवसमोर (Suryakumar Yadav) सध्या सर्वात मोठे आव्हान म्हणजे योग्य प्लेइंग 11 निवडण्याचे आहे.
भारतीय टी-20 संघात अनेक स्टार खेळाडू आहेत आणि जवळपास सर्वच खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत. मात्र, सूर्याचा गोंधळ थोडासा कमी करण्याचा प्रयत्न माजी क्रिकेटपटू इरफान पठानने (Irfan Pathan) केला आहे. पहिल्या टी-20 सामन्यासाठी त्यांनी अशी 11 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, जे खेळाडू कॅनबेरामध्ये टीमसाठी धमाकेदार कामगिरी करू शकतात.
इरफान पठान यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलची (Abhishek Sharma & Shubman gill) निवड केली आहे. अभिषेकने आशिया कप 2025 मध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती. मात्र, उंच उसळी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर त्याची कामगिरी कशी होते हे पाहणे रंजक ठरेल. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव खेळणार असून, चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा (Tilak Verma) फलंदाजी करताना दिसेल.
विकेटकीपर म्हणून इरफान पठान यांनी संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान दिले आहे. अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेसाठी त्याने अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. अक्षरने वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती, तर शिवमने आशिया कपमध्ये आपल्या खेळाने सगळ्यांना प्रभावित केले होते.
इरफान पठान यांनी तिसऱ्या वनडेमध्ये 4 बळी घेणाऱ्या हर्षित राणाला (Harshit Rana) आपल्या टी-20 संघात स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी त्यांनी जसप्रीत बुमराहवर सोपवली आहे. बुमराहला अर्शदीप सिंग (Arshdeep singh) आणि हर्षित राणा साथ देणार आहेत. मात्र, सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या कुलदीप यादवला (Kuldeep yadav) पठान यांनी अंतिम 11 मध्ये स्थान दिलेले नाही आणि त्याच्या ऐवजी वरुण चक्रवर्तीला (Varun chakrawarthy) संधी दिली आहे. स्पिन विभागात वरुणला अक्षर पटेलची साथ मिळेल.
इरफान पठानने निवडलेली टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन:
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.
Comments are closed.