'आय-पीएसी' निधीत अनियमितता
13.5 कोटीचे कर्ज देणारी कंपनी निघाली अस्तित्वहीन : आय-पॅक अडचणीत
वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगालच्या राजकारणात वादळ उभी करणारी कंपनी आय-पॅक (इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी) एका नव्या वादात सापडली आहे. एका अहवालानुसार आय-पॅकने 2021 मध्ये हरियाणाच्या रोहतक येथील एका कंपनीकडून 13.50 कोटी रुपयांचे विनातारण कर्ज घेतल्याचा दावा केला होता, परंतु शासकीय नोंदीत संबधित कंपनीचे अस्तित्वच नाही. आय-पॅककडून रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला पुरविण्यात आलेल्या दस्तऐवजांनुसार संबंधित कंपनीचे नाव रामसेतू इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड असून तिचा पत्ता रोहतक, हरियाणा असा नमूद आहे. डिसेंबर 2021 मध्ये 13.50 कोटी रुपयांचे कर्ज दाखविण्यात आले होते, ज्यातील 1 कोटी रुपये फेडल्याचा दावा जून 2025 च्या दस्तऐवजांमध्ये करण्यात आला आहे.
आता याप्रकरणी पडताळणी करण्यात आल्यावर अनेक संशयास्पद व्यवहार उघडकीस आले. अधिकृत नोंदीनुसार आय-पॅकने ज्या कंपनीचा उल्लेख केला आहे, त्या नावाची कुठलीच कंपनी नोंदणीकृत नाही. रोहतकच्या संबंधित पत्त्यावर ‘रामसेतु इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी होती, परंतु या कंपनीला ऑगस्ट 2018 मध्येच आरओसी रिकॉर्डवरून हटविण्यात आले होते. म्हणजेच कर्ज देण्याच्या तीन वर्षांपूर्वीच ही कंपनी बंद झाली होती.
या बंद झालेल्या कंपनीच्या सर्व 6 समभागधारकांनी आय-पॅकसाब्sातच्या कुठल्याही व्यवहाराची माहिती नाकारली आहे. कंपनी जमिनीच्या कामासाठी स्थापन करण्यात आली होती, तसेच कुठल्याही व्यवहाराशिवाय लवकरच बंद झाली होती असे त्यांनी सांगितले. तर हा गैरप्रकार समोर आल्यावर आय-पॅकचे सह-संस्थापक आणि संचालक प्रतीक जैन यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. ईडी यापूर्वीच आय-पॅक आणि त्याच्या संचालकांच्या विरोधात कोळसा घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करत आहे. 8 जानेवारी रोजी झालेल्या छापेमारीदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हस्तक्षेप केल्यावर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे.
Comments are closed.