IND vs NZ: रवींद्र जडेजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपणार? कसोटी संघातही स्थान न मिळाल्याने निवृत्तीच्या चर्चांना उधाण!
भारतीय कसोटी संघामध्ये सध्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. संघात मोठे बदल झाल्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रवींद्र जडेजा हा फिरकी गोलंदाजीसाठी भारतीय संघाची पहिली पसंती मानला जात होता. मात्र, पहिल्याच कसोटी सामन्यात कर्णधार शुबमन गिल (Captain Shubman gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांनी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान दिले नाही. त्यामुळे आता त्याच्या कारकिर्दीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ (Test Series between india vs new zealand) केवळ एका फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरला. यावेळी युवा फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) संधी देण्यात आली, तर रवींद्र जडेजाला बाकावर बसावे लागले. विशेष म्हणजे, जडेजाची कामगिरी चांगली असतानाही कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हा निर्णय घेतला. यापूर्वी याच संघ व्यवस्थापनाने (Team Management) रविचंद्रन अश्विनसोबतही (R Ashwin) असाच निर्णय घेतला होता. त्यानंतर अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 मध्ये रवींद्र जडेजाने आतापर्यंत 60.76 च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या दौऱ्यावरही त्याने शानदार फलंदाजी केली होती. परदेशातील मैदानांवर तो भारतीय संघाचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. याशिवाय त्याने या कालावधीत 33 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त कसोटी विकेट्स केवळ मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) घेतल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्यापेक्षाही जडेजाच्या नावावर अधिक विकेट्स आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये आता संघ व्यवस्थापनाने जडेजाला बाकावर बसवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यवस्थापन त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा शोध घेत असल्याचे दिसत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) या सायकलमधील परदेशातील ही भारताची शेवटची मालिका आहे. त्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. पुढील सायकलची तयारीही त्यानंतर सुरू होईल. वाढत्या वयामुळे जडेजा संघाच्या भविष्यातील योजनांमधून बाहेर होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याच्यासमोर निवृत्तीचा पर्याय उरू शकतो.
वनडे क्रिकेटमध्येही रवींद्र जडेजासोबत असेच घडत असल्याचे चित्र आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत अनेक खेळाडूंनी गोलंदाजीत निराशाजनक कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर संघाबाहेर केवळ जडेजालाच करण्यात आले. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्येही तो संघ व्यवस्थापनाच्या भविष्यातील योजनांचा भाग नसल्याचे दिसत आहे. यामुळे आता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
जडेजाने टी-20 क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. मात्र, तरीही संघातील स्थान कायम राखण्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे.
Comments are closed.