तिवारीचे कुटुंब गांधींशी संबंधित आहे का?

सोशल मिडिया संदेशामुळे वादळ, भाजपची टीका

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘सांप्रतच्या काळातील युवक घराणेशाहीच्या माध्यमातून मिळालेले जन्मजात अधिकार मानणार नाहीत’, अशा अर्थाचा सूचक संदेश काँग्रेसचे लोकसभा सदस्य मनीष तिवारी यांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गतच मोठे वादळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने ही संधी घेत काँग्रेसवर शरसंधान केले असून हे विधान राहुल गांधी यांना उद्देशूनच आहे, अशी खोचक टीका केली. मात्र, काँग्रेसने यावर अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे शंकेला अधिकच वाव मिळतो, असे तज्ञांचे मत आहे.

मनिष तिवारी यांनी भारताच्या भोवतीच्या आणि दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या आणि सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर हा संदेश प्रसारित केला आहे. त्यांचे मूळ विधान ‘टुडेज जनरेशन विल नो लाँगर अॅक्सेप्ट एन्टायटलमेंट’ असे आहे. ‘एन्टायटलमेंट’ याचा अर्थ आधीपासून मिळालेले अधिकार किंवा परंपरागत अधिकार असा होऊ शकतो. त्यामुळे त्यांचे हे विधान राहुल गांधी यांना उद्देशूनच आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला. कारण राहुल गांधी हे गांधी-नेहरु घराण्याचे वारसदार आहेत. राजकीय घराण्यांच्या अशा वारसदारांच्या सत्तेविरोधातच नेपाळमध्ये युवकांनी उग्र आंदोलन उभे करुन के. पी. शर्मा ओली यांचे सरकार नुकतेच उलथविले आहे. त्यामुळे तिवारी यांना हे विधान करुन नेमके काय साधायचे आहे आणि त्यांचा रोख राहुल गांधी यांच्यावर आहे का, हे प्रश्न निर्माण झालेले असून त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कुटुंबाची सत्ता अमान्य

भारतातही युवकांना एका कुटुंबाची सत्ता अमान्य आहे राहुल गांधी हे सातत्याने नकारात्मक राजकारण करुन देशात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही देशातील युवक त्यांच्या बाजूने उभे रहात नाहीत. कारण राहुल गांधी हे एका कुटुंबाच्या सत्तेला प्राधान्य देतात. ते स्वत: त्यांच्या आजच्या स्थानापर्यंत घराण्याचाच आधार घेऊन पोहचलेले आहेत. त्यामुळे ते युवकांना आकर्षित करु शकणार नाहीत, अशा अर्थाची टीका भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी मंगळवारी येथे केली.

राहुल गांधी यांचे विधान

भारतातील तरुणांनी (जेन झेड) भारताच्या राज्यघटनेच्या संरक्षणासाठी ‘उभे’ रहावे. मी त्यांना समर्थन देईन अशा अर्थाचा संदेश सोशल मिडियावर राहुल गांधी यांनी प्रसारित केला होता. असा गर्भित संदेश देऊन ते युवकांना भडकावित आहेत. देशात अराजक माजविण्याचा त्यांचा हेतू आहे, अशी टीका झाली होती.

Comments are closed.