ईशान किशनचा वनवास संपला, भारताच्या संघात मिळाली संधी; दमदार परतीची अपेक्षा!
14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघासोबतच निवडकर्त्यांनी भारत अ संघाचीही घोषणा केली आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ 13 नोव्हेंबरपासून तीन अनधिकृत एकदिवसीय सामने खेळतील. या मालिकेसाठी इशान किशनचाही भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे.
इशान किशन बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. यामुळे भारत अ संघाला स्वतःला सिद्ध करण्याची आणि मुख्य संघात आपले स्थान निश्चित करण्याची संधी मिळते. इशान किशन दोन वर्षांपूर्वी शेवटचा टीम इंडियाकडून खेळला होता. टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी इशान किशन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे, तो भारत अ संघासाठी संधीचे सोने करेल अशी अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी तिलक वर्मा याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संघात अनुभवी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या दोन्ही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाकडून खेळण्यास सांगितले जाऊ शकते अशी शक्यता आधी वर्तवली जात होती, परंतु निवडकर्त्यांनी तसे केलेले नाही.
हर्षित राणा याचाही या संघात समावेश आहे. यावरून स्पष्ट होते की हर्षित राणा याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड होऊ शकते. तथापि, हर्षितचा कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नाही. तो सध्या टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.
भारत अ एकदिवसीय संघ: तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (यष्टीरक्षक), आयुष बदोनी, निशांत सिंधू, विप्रज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).
Comments are closed.