शतक झळकावत ईशान किशनची अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, SMATमध्ये इतक्या धावा ठोकल्या

झारखंड क्रिकेट संघाने इतिहास रचत प्रथमच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाला 69 धावांनी पराभूत करत खिताबावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला कर्णधार ईशान किशन, ज्याने अंतिम सामन्यात जबरदस्त शतक झळकावत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही आपल्या नावावर केला.

हरियाणाने नाणेफेक जिंकून झारखंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. झारखंडकडून ईशान किशन आणि विराट सिंग यांनी डावाची सुरुवात केली. विराट सिंग अवघ्या 2 धावांवर बाद झाला, मात्र त्यानंतर ईशान किशनने कुमार कुशाग्रसोबत मिळून डाव सावरत आक्रमक फलंदाजीचा सुरेख नमुना सादर केला. ईशानने अवघ्या 49 चेंडूत 101 धावा करत मैदान गाजवले. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 10 षटकार ठोकले.

ईशानच्या या खेळीमुळे झारखंडने 20 षटकांत तब्बल 262 धावांचा डोंगरासारखा स्कोअर उभारला. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरियाणाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. यशवर्धन दलालने 53 धावा तर समंत जाखडने 38 धावांचे योगदान दिले, पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. अखेर हरियाण्याचा डाव 193 धावांत आटोपला.

या शतकासह ईशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील पाचवे शतक पूर्ण केले. त्यामुळे त्याने या स्पर्धेत सर्वाधिक शतके करणाऱ्या अभिषेक शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. देवदत्त पडिक्कल, उन्मुक्त चंद, ऋतुराज गायकवाड, उर्विल पटेल आणि श्रेयस अय्यर यांनी प्रत्येकी तीन शतके झळकावली आहेत.

विशेष म्हणजे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये ईशान किशन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 10 सामन्यांत 517 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतके समाविष्ट आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत ईशानने 64 सामने खेळत 1977 धावा केल्या आहेत.

Comments are closed.