टी20 सामन्याच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज, ईशान किशनची विक्रमी कामगिरी
गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय सलामीवीर ईशान किशनने आपल्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला 20 षटकांत 153 धावांवर रोखण्यात यश मिळवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या 10 षटकांत सामना जिंकत मालिकेत आपला दबदबा कायम ठेवला.
भारताच्या डावाची सुरुवात धक्कादायक ठरली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला. मात्र दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या ईशान किशनवर या विकेटचा कोणताही परिणाम झाला नाही. ईशानने पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीवर हल्लाबोल करत 16 धावा काढल्या आणि एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये ईशान किशन संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
टी-20 सामन्यात पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
18 धावा: वीरेंद्र सेहवाग विरुद्ध न्यूझीलंड (2009)
17 धावा: रोहित शर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2018)
16 धावा: ईशान किशन विरुद्ध न्यूझीलंड (2026)*
16 धावा: संजू सॅमसन विरुद्ध इंग्लंड (2025)
ईशानने डावातील पहिल्या चेंडूवर शून्य धाव घेतल्यानंतर पुढील दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकले. त्यानंतर एका चौकारासह स्कोअर 16 धावांपर्यंत नेला. या आक्रमक सुरुवातीमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव आला. ईशान किशन 13 चेंडूंमध्ये 28 धावांची तडाखेबंद खेळी करून बाद झाला, पण तोपर्यंत भारताला दमदार सुरुवात मिळाली होती.
ईशानच्या या खेळीनंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा अक्षरशः समाचार घेतला. भारताने पॉवरप्लेमध्ये केवळ 6 षटकांत 94/2 असा भक्कम स्कोअर उभारला, जो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताच्या सर्वोत्तम पॉवरप्ले कामगिरींपैकी एक ठरला. अभिषेक शर्माने अवघ्या 20 चेंडूंमध्ये 68 धावांची नाबाद खेळी केली. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 340 इतका होता, ज्यामध्ये 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादवने 26 चेंडूंमध्ये नाबाद 57 धावा केल्या.
या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 40 चेंडूंमध्ये 102 धावांची नाबाद भागीदारी झाली आणि भारताने 154 धावांचे लक्ष्य फक्त 10 षटकांत पूर्ण करत 8 विकेट्सनी शानदार विजय मिळवला. ईशान किशनची आक्रमक सुरुवात, अभिषेक आणि सूर्यकुमारची तडाखेबंद फलंदाजी यामुळे हा सामना भारतासाठी पूर्णपणे एकतर्फी ठरला.
Comments are closed.