Ind vs NZ Final – फायनलपूर्वीच टीम इंडियाच्या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, कार अपघातामध्ये बहिणीने गमावला जीव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिंदुस्थानने ऐतिहासिक कामगिरी करत आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या ट्रॉफिवर आपले नाव कोरले. या सामन्यात हिंदुस्थानने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असताना हिंदुस्थानचा फलंदाज इशान किशनवर दु:खाचा डोंगर कोसळला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या अवघ्या एक दिवस आधी इशानच्या चुलत बहिणीचा आणि तिच्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झालं. या दु:खद बातमीने इशान पूर्णपणे खचला होता, मात्र त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत देशासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, इशान किशनचे वडील प्रणव पांडे मुलाचा खेळ पाहण्यासाठी पाटण्याहून अहमदाबादला जाणार होते. मात्र, विमानतळावर पोहोचताच त्यांना या भीषण अपघाताची बातमी समजली आणि त्यांना आपला प्रवास रद्द करून सिलीगुडीला रवाना व्हावे लागले. इशानच्या बहिणीची कार एका ट्रकला धडकली होती, ज्यामध्ये बहिणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिची दोन लहान मुले सुदैवाने बचावली आहेत. वडिलांनी इशानला या घटनेची माहिती दिली तेव्हा तो अत्यंत अस्वस्थ झाला होता, पण त्याने संघासोबत राहणे पसंत केले.

या कठीण प्रसंगात हार्दिक पांड्याने इशानला धीर दिला. इशानने सामन्यानंतर सांगितले की, “फायनलच्या आधी मी माझ्या बहिणीला गमावले होते. मी हार्दिक भाईशी बोललो, तेव्हा त्याने मला यावेळी संघाला महत्त्व देण्यास सांगितले. मी आज माझ्या बहिणीसाठीच खेळलो.” इशानने या सामन्यात 54 धावांची स्फोटक खेळी केली आणि अर्धशतक पूर्ण केल्यावर बॅट आकाशाकडे दाखवून आपले हे यश स्वर्गवासी बहिणीला समर्पित केले. योगायोगाने हा सामना जागतिक महिला दिनी पार पडल्याने हे समर्पण अधिक भावूक ठरले.

हिंदुस्थाने हा सामना 96 धावांनी जिंकून तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. इशान किशनने या संपूर्ण स्पर्धेत 317 धावा करून हिंदुस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वैयक्तिक आयुष्यात बहिणीला गमावल्याचे दु:ख असतानाही, इशानने दाखवलेली जिद्द आणि खेळाप्रती असलेली निष्ठा पाहून क्रीडा जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.