इशानचे जेतेपदावर निशान, झारखंड प्रथमच सय्यद मुश्ताक अली करंडकाचा विजेता

संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱया इशान किशनने अंतिम सामन्यातही आपला सर्वोत्तम झंझावात दाखवत झारखंडला इतिहास रचून दिला. कर्णधार इशानने 49 चेंडूंत फटकावलेल्या 101 धावांच्या आक्रमक शतकाच्या जोरावर झारखंडने हरयाणाचा 69 धावांनी पराभव करत सय्यद मुश्ताक अली करंडकावर प्रथमच आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला.
गुरुवारी एमसीए स्टेडियमवर मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या चाहत्यांचे इशानने आक्रमक फलंदाजीने भरभरून मनोरंजन केले. सलामीवीर विराट सिंग लवकर बाद झाला असला तरी इशानने डाव सावरत संघाला दिशाहीन होऊ दिले नाही. सपाट खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत त्याने युवा कुमार कुशाग्रसोबत 177 धावांची भक्कम भागीदारी रचली. कुशाग्रने 38 चेंडूंत 81 धावांची झुंजार खेळी केली. या जोरावर झारखंडने 3 बाद 262 धावांचा डोंगर उभारला. त्या डोंगरावर हरयाणाचा संघ चढू शकला नाही.
पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करत झारखंडने 69 धावा जमवल्या. राष्ट्रीय निवडकर्ते साक्षीदार असताना इशानने पार्थ वत्स आणि अंशुल पंबोजवर हल्ला चढवत 14 व्या षटकात एकहाती षटकारासह शतक साकारले. अंतिम सामन्यात शतक करणारा तो अनमोलप्रीत सिंगनंतरचा दुसराच फलंदाज ठरला. यानंतर अंकुल रॉय (मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू) आणि रॉबिन मिन्झ यांच्या नाबाद 75 धावांच्या भागीदारीमुळे झारखंडने अंतिम सामन्यातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
प्रत्युत्तरात हरयाणाची सुरुवातच डळमळीत झाली. अंकित कुमार आणि आशीष सिवाच शून्यावर बाद झाले. पुढे निशांत सिंधू व यशवर्धन दलाल यांनी 67 धावांची भागीदारी केली. यशवर्धनने 22 चेंडूंत 53 धावांची फटकेबाजी करत हरयाणाच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाद झाल्यानंतर हरयाणाने सामना गमावला होता. यशवर्धन आणि निशांत या दोघांची विकेट अनुकूल रॉयने काढली. त्यानंतर त्यांच्या उर्वरित फलंदाजांनी केवळ शेवटची धडपड करत संघाला 193 पर्यंत नेले. झारखंडच्या सुशांत मिश्रा आणि बाल कृष्णा यांनी प्रत्येकी तीन विकेट टिपत हरयाणाचा डाव 9 चेंडू आधीच संपवला. आजची संपूर्ण संध्याकाळ इशान किशनचीच ठरली. 2023 पासून हिंदुस्थानी संघाबाहेर असलेल्या या यष्टिरक्षक-फलंदाजाने स्पर्धेत 517 धावा ठोकत राष्ट्रीय निवड समिती सदस्यांचे लक्ष पुन्हा एकदा वेधले आहे. मुंबईत शनिवारी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या संघनिवडीआधी इशानने स्वतःच्या क्षमतेची ओळख करून दिल्यामुळे निवड समितीला या धुरंधराच्या नावाचा विचार करावा लागणार आहे, हे निश्चित.

Comments are closed.