दोन वर्षे संघाबाहेर, तरीही ईशान किशन थेट वर्ल्ड कप संघात कसा? सूर्यकुमार यादव आणि निवडकर्त्यांकडून निवडीचं कारण स्पष्ट

ईशान किशनला (Ishaan kishan) 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. पण अनेकांना प्रश्न पडला आहे की, केवळ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमधील शतकामुळे त्याची निवड झाली का? शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर उपस्थित होते.

अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी ईशान किशनच्या निवडीमागची कारणे स्पष्ट केली आहेत. विशेष म्हणजे, ईशानने नोव्हेंबर 2023 मध्ये आपला शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो बराच काळ संघाबाहेर होता आणि त्या दरम्यान त्याला बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही वगळण्यात आले होते. मात्र, त्याने पुन्हा कॉन्ट्रॅक्ट मिळवले आणि आता थेट वर्ल्ड कप संघात पुनरागमन करत ‘देर आए दुरुस्त आए’ हे सिद्ध केले.

शुबमन गिलला संघात स्थान न मिळाल्याने सर्वजण थक्क झाले होते, कारण तो संघाचा उपकर्णधार होता. गिलला दुखापत झाली होती खरी, पण त्याला संघातून वगळण्याचे कारण दुखापत नसून त्याचा खराब फॉर्म हेच आहे. आगरकर म्हणाले की, गिल गेल्या काही काळापासून धावा करू शकत नव्हता, त्यामुळे त्याला संघात स्थान दिले नाही. आम्ही सध्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनाच प्राधान्य दिले आहे. येथे आगरकर यांचा इशारा ईशान किशनकडे होता, जो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 500 हून अधिक धावा करणारा तो स्पर्धेतील एकमेव खेळाडू होता.

कर्णधार सूर्याने स्पष्ट केले की, हा फक्त गिलच्या फॉर्मचा प्रश्न नाही, तर आम्हाला टॉप ऑर्डरमध्ये (ओपनिंगला) यष्टीरक्षक फलंदाज हवा होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात गिलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनने 22 चेंडूत 37 धावा करून आक्रमक सुरुवात करून दिली होती. ईशान किशन सुद्धा सलामीला येतो आणि तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, ज्याचा फायदा संघाला होईल.

टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, ईशान किशन (विकेटकीपर).

टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारताचे सामने:
7 फेब्रुवारी अमेरिका मुंबई
12 फेब्रुवारी नामीबिया दिल्ली
15 फेब्रुवारी पाकिस्तान कोलंबो
18 फेब्रुवारी नेदरलँड्स अहमदाबाद

Comments are closed.