या कारणांमुळे त्याने गिल आणि जितेशला मागे टाकलं, माजी मुख्य निवडकर्त्यांकडून ईशान किशनचं कौतुक
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात धडाकेबाज एन्ट्री करत ईशान किशनने (Ishaan kishan) अनेक प्रबळ दावेदारांना मागे टाकले आहे. सध्या तो क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून, अनेक दिग्गज त्याच्याबद्दल मत मांडत आहेत. आता माजी मुख्य निवडकर्ता कृष्णाचारी श्रीकांत (Krushnamachari Shrikant) यांनी ईशानच्या निवडीचे समर्थन करत त्याचे भरभरून कौतुक केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील वादळी कामगिरीच्या जोरावर ईशानने जितेश शर्मा, ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांसारख्या खेळाडूंना मागे टाकत विश्वचषकाचे तिकीट मिळवले आहे.
श्रीकांत यांनी ईशानच्या निवडीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मला यशस्वी जयस्वालसाठी वाईट वाटत आहे, तो दुर्दैवी ठरला. पण ईशानच्या निवडीमुळे टीम इंडियाला एक सलामीवीर (Opener) आणि विकेटकीपर असे दोन्ही पर्याय एकाच खेळाडूत मिळाले. याच कारणामुळे ईशानने जितेश शर्मा (Jitesh Sharma) आणि शुबमन गिलला (Shubman gill) मागे टाकले आहे. ईशान हा एक विलक्षण खेळाडू आहे, ज्या दिवशी त्याची बॅट तळपते, त्या दिवशी तो समोरच्या संघाला उध्वस्त करतो. त्याची निवड खरोखरच कौतुकास्पद आहे.
ते पुढे म्हणाले की, निवडकर्त्यांनी देशांतर्गत क्रिकेटकडे बारकाईने लक्ष दिले. ईशानने ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’मध्ये केवळ धावाच केल्या नाहीत, तर आपल्या संघाला विजेतेपदही मिळवून दिले. तो यापूर्वी द्विशतकवीर राहिला आहे आणि विश्वचषक संघाचा भागही होता, पण मधल्या काळात तो गायब झाला होता. आता त्याचे हे पुनरागमन पाहून मला खूप आनंद होत आहे.
ईशान किशनने नुकतेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरियाणाविरुद्ध झंझावाती शतक झळकावले. या हंगामात त्याने विक्रमांचा पाऊस पाडला. ईशानच्या नेतृत्वाखाली झारखंडचा संघ पहिल्यांदाच चॅम्पियन बनला. त्याच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळीमुळे निवडकर्त्यांना भारतीय संघाची रणनीती बदलणे भाग पडले. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक 517 धावा केल्या, ज्यामध्ये फायनलमधील निर्णायक शतकाचा समावेश होता.
Comments are closed.