दिल्लीत आयएसआयएसच्या मॉड्यूलचा पर्दाफाश

विशेष शाखेकडून दोन दहशतवाद्यांना अटक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने एक मोठे यश मिळविले आहे. राजधानीत आयएसआयएसच्या एका मॉड्यूलचा भांडाफोड करत पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. यातील एक दहशतवादी हा दिल्लीचा रहिवासी  तर दुसरा मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. प्रारंभिक तपासात हे दोन्ही दहशतवादी ‘आत्मघाती’ हल्ल्याचे प्रशिक्षण मिळवत होते असे समोर आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना पकडले आहे. यातील एका दहशतवाद्याला दिल्लीमधून तर दुसऱ्या दहशतवाद्याला भोपाळ येथून ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील गर्दीयुक्त भाग या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. या दहशतवाद्यांनी एक मॉल आणि उद्यानाची रेकी केली होती. या दहशतवाद्यांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दारूगोळाही हस्तगत करण्यात आला आहे. यातील एका दहशतवाद्याचे नाव अदनान खान असून तो भोपाळचा रहिवासी आहे. तर दिल्लीतील 20 वर्षीय अदनान खान उर्फ अबू मुहरिब यालाही अटक करण्यात आली आहे.

काही दहशतवादी राजधानीत मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर विशेष पथकांनी सापळा रचून या दोन्ही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दोन्ही दहशतवाद्यांच्या अटकेमुळे एक मोठा दहशतवादी हल्ला टाळण्यास यश मिळाले आहे.

आत्मघातकी हल्ल्याची तयारी

अटक करण्यात आलेले दहशतवादी दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये स्वत:च्या कारवायांना संचालित करत आत्मघाती हल्ल्याचा कट रचत होत. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर त्यांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादी संघटना सातत्याने स्वत:च्या रणनीतिंमध्ये बदल करत असून युवांची दिशाभूल करत हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.