Iran Israel War – बेंजामिन नेतान्याहू यांच्या निधनाच्या चर्चा अफवाच; इस्रायली राजदूतानी केले स्पष्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूचे दावे केले जात असून, व्हायरल होणारे व्हिडिओ एआय निर्मित असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, आता हिंदुस्थानातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी या प्रकरणावर मोठे विधान करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पंतप्रधान नेतान्याहू पूर्णपणे जिवंत आणि सक्रिय असून आपण त्यांना अनेकदा प्रत्यक्ष पाहिले असल्याचे अझर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी जेरुसलेममधील कॅफेमधील व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली असून नेतान्याहू यांचे आरोग्य उत्तम असल्याचे सांगितले आहे.

नेतान्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांना तेव्हा उधाण आले, जेव्हा एका जुन्या व्हिडिओमध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला होता. ही एआयची चूक असून नेतान्याहू आता हयात नाहीत, असा प्रचार सोशल मीडियावर, विशेषतः इराण समर्थक हँडलवरून केला जात होता. या अफवांना चपराक देण्यासाठी स्वतः नेतान्याहू यांनी जेरुसलेममधील ‘द सताफ’ कॅफेमधून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी हातात कॉफीचा कप घेऊन हसतमुख मुद्रेने विरोधकांना उत्तर दिले आहे. इतकेच नाही तर, त्यांनी आपले दोन्ही हात उंचावून पाच बोटे दाखवत ‘सहा बोटां’च्या दाव्यातील फोलपणा सिद्ध केला आहे.

इराणच्या हल्ल्यात नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याच्या दाव्यांनंतर त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, अद्यापही काही युजर्स या व्हिडिओच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. व्हिडिओचे ‘फ्रेम-बाय-फ्रेम’ विश्लेषण करणाऱ्या काही दाव्यांनुसार, व्हिडिओमधील ओठांची हालचाल आणि कॉफीचा स्तर संशयास्पद वाटत असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी, इस्रायली दूतावासाने हे सर्व दावे फेटाळून लावत पंतप्रधान सुरक्षित असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

Comments are closed.