इराण हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी निर्णय पुढे ढकलला; जगभरातील तणाव वाढला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता अमेरिका या युद्धात उतरणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, इराणवर हल्ला करण्याबाबत ट्रम्प यांनी निर्णय घेतलेला नाही, याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनी दोन आठवड्यांनी पुढे ढकलला आहे. ट्रम्प यांच्या या धोरणामुळे इराण- इस्रायल युद्धाची तीव्रता आणि जगभरातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात इराणविरुद्ध लष्करी कारवाईचा निर्णय घेतील. व्हाईट हाऊसने ही माहिती दिली आहे. इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. एका हल्ल्यात इस्रायली रुग्णालयाचे नुकसान झाले आहे.
इराण आणि इस्रायलमधील या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या भूमिकेबद्दल एक मोठे संकेत मिळाले आहेत. व्हाईट हाऊसने गुरुवारी सांगितले की अमेरिकेने इराणविरुद्ध लष्करी कारवाई करावी की नाही हे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात ठरवतील. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा संदेश जनतेला देताना सांगितले की, आगामी काळात इराणशी होणाऱ्या चर्चेबाबतची शक्यता विचारात घेत राष्ट्रपती पुढील दोन आठवड्यात योग्य तो निर्णय घेतील.
लेविट पुढे म्हणाले की ट्रम्प नेहमीच राजनैतिक तोडग्याच्या बाजूने असतात. ते म्हणाले, “ते शांततेचे समर्थक आहेत. ते ‘शक्तीद्वारे शांतता’ या तत्त्वावर विश्वास ठेवतात. राजनैतिकत समेटाची शक्यता असेल तर राष्ट्रपती निश्चितच ते स्वीकारतील. शक्ती दाखवायची असेल तर ते त्यापासून मागे हटणार नाहीत. हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका वृत्तात म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यांनी अद्याप अंतिम आदेश दिलेला नाही. त्यांना इराण आपला अणुकार्यक्रम थांबवतो की नाही हे पहायचे आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले होते की, “मी हल्ला करेन, आणि करणार नाही. पुढचा आठवडा खूप महत्त्वाचा असेल, कदाचित निर्णय आणखी कमी वेळेत घेतला जाईल.” गुरुवारी, इस्रायलने इराणच्या अणुसंबंधित स्थळांवर हवाई हल्ला केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सोडले. यापैकी एका हल्ल्यात दक्षिण इस्रायलमधील बीअर शेवा येथील सोरोका मेडिकल सेंटरचे नुकसान झाले. आता सर्वांच्या नजरा अमेरिकेच्या निर्णयावर आहेत, ट्रम्पचा निर्णय या संपूर्ण संघर्षाची दिशा ठरवू शकतो.
Comments are closed.