Israel Iran War – युद्धाचा शेअर बाजाराला मोठा फटका; परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 88,000 कोटी काढले
अमेरिका, इस्रायल- इराण युद्ध तीव्र झाले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतच आहेत आणि भारतीय रुपया घसरत आहे. या परिस्थितीत, परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून बाहेर पडत आहेत. त्यांनी मार्च महिन्यात आतापर्यंत ८८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण दिसत आहे.
आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे जगभरातील अनेक देश होरपळले आहेत. युद्ध सुरूच असल्याने तेलाचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे जागतिक तणाव वाढत आहे. सुरुवातीला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वरिष्ठ नेते आणि लष्करी तळांना लक्ष्य केले जात होते, पण आता या युद्धाचे रूपांतर तेल युद्धात झाले असून, क्षेपणास्त्रांद्वारे ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केले जात आहे.
इराण युद्धामुळे हिंदुस्थानसह जगभरातील शेअर बाजार हादरले आहेत. त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारही घाबरले आहे. एफपीआय (FPIs) इतके निराश झाले आहेत की, त्यांनी या महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री करून भारतीय शेअर बाजारातून ८८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढते युद्ध, कच्च्या तेलाच्या किमतींमधील झपाट्याने झालेली वाढ आणि त्यानंतर भारतीय चलन रुपयाचे झालेले अवमूल्यन, यामुळे परदेशी गुंतवणूकदार धास्तावले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी आखाती युद्ध सुरू झाल्यापासून एफपीआयने मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. केवळ पहिल्या पंधरवड्यातच त्यांनी ५२,७०४ कोटी रुपये (अंदाजे ५.७३ अब्ज डॉलर्स) काढून घेतले. ज्यात गेल्या आठवड्यात आणखी वाढ झाली. मार्च महिन्यात आतापर्यंत एफपीआयने ८८,१८० कोटी रुपये (अंदाजे ९.६ अब्ज डॉलर्स) काढून घेतले आहेत.
युद्धाचा तणाव आणि जगभरातील देशांवर होणाऱ्या त्याच्या परिणामामुळे मार्च महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास दररोज विक्री केली आहे. महिन्याच्या केवळ तीन आठवड्यांत पैसे काढण्याचे प्रमाण ८८,१८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी, परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये पैसे काढले होते. मार्चमधील या मोठ्या घसरणीमुळे 2026 मध्ये आतापर्यंत एफपीआयने १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली आहे.
फेब्रुवारीमध्ये एफपीआय भारतीय शेअर बाजारात परतले, जे तीन महिन्यांनंतर झालेले पुनरागमन होते. आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये ३,७६५ कोटी रुपये, डिसेंबर २०२५ मध्ये २२,६११ कोटी रुपये आणि जानेवारी २०२६ मध्ये ३५,९६२ कोटी रुपये काढले. यानंतर फेब्रुवारीमध्ये २२,६१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी गेल्या १७ महिन्यांतील सर्वाधिक होती.
परदेशी गुंतवणूकदारांच्या उदासीनतेमागे अनेक कारणे आहेत. मध्य पूर्वेतील युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. २८ फेब्रुवारीपूर्वी, तेलाचा भाव प्रति बॅरल सुमारे ७० डॉलर होता, परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर त्यात मोठी वाढ झाली आणि सध्या तो ११२ डॉलरच्या वर आहे. भारतीय रुपयाच्या सततच्या घसरणीनेही परदेशी गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. युद्धापूर्वी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य सुमारे ९१ होते, परंतु आता त्याने ९३ चा आकडा ओलांडला आहे. अनेक तज्ज्ञांनी रुपया ९५ पर्यंत घसरू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढत आहेत.
Comments are closed.