Israel Iran War – आजची रात्र मंगल ठरणार की अमंगल? जे.डी. व्हान्स यांच्या विधानाने जगाचे आखाताकडे लक्ष

गेल्या सहा आठवड्यांपासून अमेरिका, इस्रायल इराण युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे, त्याची मुदत आता संपणार आहे. त्याआधीच, ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच एक मोठी धमकी दिली आहे. आज रात्री एका संपूर्ण संस्कृतीचा अंत होईल, जी पुन्हा कधीही पूर्ववत करता येणार नाही. मला हे घडावे असे वाटत नाही, पण कदाचित ते घडेल. आता सर्व देवाच्या हातात आहे. ट्रम्प यांच्या धमकीने जगाची चिंता वाढली असतानाच अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे जगाच्या नजरा आता आखाताकडे लागल्या आहेत. आज रात्री नेमके काय होणार, ही चिंता जगाला भेडसावत आहे.

बुडापेस्ट येथे झालेल्या अमेरिका-हंगेरी बैठकीनंतर, जेडी व्हान्स म्हणाले की इराणसोबतच्या वाटाघाटी आणि चर्चा संथ गतीने सुरू आहे. आम्हाला इराणकडून रात्री ८ वाजेपर्यंत प्रतिसादाची अपेक्षा आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी चर्चेच्या अनेक फेऱ्या अपेक्षित आहेत. जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर त्याचे विनाशकारी परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी इराणबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी सांगितले की, इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटी संथ गतीने पुढे जात आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत इराणकडून प्रतिसाद मिळण्याची अमेरिकेला अपेक्षा आहे.

व्हान्स यांच्या विधानावरून येणारे काही तास निर्णायक ठरू शकतात. या संपूर्ण घडामोडीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सर्वांचे लक्ष इराणच्या प्रतिसादावर आणि निर्धारित वेळेत काही ठोस परिणाम साधता येतात की नाही यावर लागले आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार इराणे चर्चेचे सर्व मार्ग बंद केले असून अमेरिकेसोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करार करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत जवळ येत असतानाही, तेहरान आपल्या भूमिकेवर ठाम आहे. एका इराणी अधिकाऱ्याने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संभाव्य अमेरिकन हल्ल्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी देशाच्या ऊर्जा प्रकल्पाभोवती मानवी साखळी तयार करावी. मात्र, या परस्परविरोधी वक्तव्य आणि घडामोडींमुळे आखातात नेमके काय होणार, याबाबतचा संभ्रम वाढत आहे. आजची रात्र मंगल ठरणार की अमंगल याची जगभरात चर्चा असून सर्वांचे लक्ष आखाताकडे लागले आहे.

Comments are closed.