Israel Iran War – त्यांनी मृत व्यक्तीला सर्वोच्च नेता बनवले? इराणचा कारभार IRGC चालवत असल्याचा संशय
अमेरिका, इस्रायल-इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाले आहे. अमेरिका, इस्रायलने इराणवर एक मोठा हल्ला केला, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. हा इराणसाठी एक मोठा धक्का होता. पण इराणी व्यवस्था डगमगली नाही. त्यांनी ९ मार्च रोजी अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची नवीन सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण तेव्हापासून मोजतबा एकदाही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या जिवंत असण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
जगात क्वचितच असा एखादा देश असेल जिथे सर्वात प्रमुख नेता दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सत्तेवर असूनही एकदाही सार्वजनिकरित्या दिसला नसेल. भाषण नाही, फोटो नाही, व्हिडिओ नाही. त्यामुळे मोज्तबा खामेनी यांच्या अस्तित्वाबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
२८ फेब्रुवारीच्या हल्ल्यात मोज्तबाही जखमी झाले. इस्रायली आणि अमेरिकन गुप्तचर सूत्रांनुसार, ते जिवंत आहेत, पण त्यांच्या जखमा इतक्या गंभीर आहेत की ते लोकांसमोर येऊ शकत नाहीत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने ‘ॲक्सिऑस’ला सांगितले, इराणी लोकांनी एका मृत व्यक्तीला सर्वोच्च नेता बनवले असेल यावर आमचा विश्वास नाही. पण ते देश चालवत आहेत हे देखील सिद्ध झालेले नाही. ते जिवंत आहेत की केवळ एक नाममात्र व्यक्ती? मोज्तबा खामेनी यांच्याभोवती अनेक प्रश्न आहेत. इराणचा कारभार आयआरजीसी चालवत आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी, जिवंत आहेत पण दिसत नाहीत. ते जखमी असूनही निवेदने देत आहेत. देशाचा कारभार चालवला जात आहे, पण सूत्रे आयआरजीसीच्या हातात असल्याचे दिसते, आणि तेहरानचा खरा सूत्रधार कोण आहे हे जगाला अजूनही कळलेले नाही. खामेनी यांनी आतापर्यंत दोन निवेदने दिली आहेत, पण ते एकदाही दिसलेले नाहीत. मोज्तबा यांनी दोन निवेदने जारी केली, पण दोन्ही वेळा ती त्यांनी स्वतः न वाचता दुसऱ्याच कोणीतरी वाचली.
या सर्व घडामोडींवरून खरी सत्ता कोणाच्या हातात आहे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इस्रायली वृत्तपत्र ‘द जेरुसलेम पोस्ट’ने अमेरिकन-इस्रायली गुप्तचर सूत्रांचा हवाला देत लिहिले आहे की, सध्या इराणमधील खरी सत्ता आयआरजीसी (IRGC) म्हणजेच रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या हातात असून, मोज्तबा हे त्याचे सर्वोच्च नेते आहेत. परंतु प्रत्यक्षात, आयआरजीसी आपल्या मर्जीनुसार काम करते. म्हणूनच ट्रम्प यांच्या गुप्तचर बैठकांमध्येही, “तेहरानमध्ये सूत्रे कोणाच्या हातात आहेत?” हा प्रश्न अजूनही उपस्थित केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा पथक अजूनही या उत्तराच्या शोधात आहे.
Comments are closed.