Israel Iran War – मध्यपूर्वेतील संघर्षात समुद्रात अडकल्या 2 हजारांपेक्षा जास्त कार, आता कंपनीसमोर उरला केवळ एकच पर्याय…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता हिंदुस्थानच्या निर्यात व्यवस्थेवर होत आहे. अहवालांनुसार, आखाती देशांमध्ये जाणाऱ्या सुमारे 2 हजार हुंडई वाहने चेन्नई बंदरात परत आणण्याची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धपरिस्थितीमुळे समुद्रात जाणाऱ्या जहाजांचे मार्ग बदलले जात आहेत, ज्यामुळे संपूर्ण निर्यात नियोजन विस्कळीत होत आहे. यामध्ये आखाती देशांना जाणाऱ्या सुमारे 2 हजार गाड्या समुद्रातच अडकल्या आहेत. त्यामुळेच या गाड्या चेन्नईला परत आणण्याशिवाय पर्याय उरला नाही. युद्ध हे हिंदुस्थानपासून दूरवर सुरु असले तरीही, हिंदुस्थानातील निर्यात व्यवस्था ही कोलमडून पडली आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील या युद्धाचा विशेषतः ऑटोमोबाईल आणि कापड निर्यातीवर परिणाम होत आहे.

न्यू इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता हिंदुस्थानच्या निर्यात अर्थव्यवस्थेवर गडदपणे दिसून येत आहे. अहवालानुसार ह्युंदाई मोटर इंडियाने आखाती देशांमध्ये पाठवलेली सुमारे 2 हजार वाहने आता चेन्नई बंदरात परत आणली जाण्याची शक्यता आहे. ही वाहने मूळतः हंबनटोटा बंदरातून पश्चिम आशियाई बाजारपेठेत नेण्याचे नियोजन होते. समुद्रात सुरू असलेल्या युद्धासारख्या अशांततेमुळे शिपिंग कंपन्यांना त्यांचे मार्ग आणि मालवाहतुकीचा पुनर्विचार करावा लागत आहे.

बंदर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अहवालात असे म्हटले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्र हे प्रमुख सागरी मार्ग आहेत. परंतु युद्धाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने सागरी मार्गांमधील सध्याच्या परिस्थितीमुळे जहाजांच्या वाहतुकीचा धोका वाढला आहे. परिणामी अनेक शिपिंग कंपन्या सध्या या मार्गांवरून जाणे टाळत आहेत. या संकटामुळे आखाती देशांमध्ये कंटेनर वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. बंदरातील सूत्रांचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, अंदाजे 4 हजार कंटेनर त्यांच्या नियोजित मार्गांवरून वळवण्यात आले आहेत. त्यापैकी अंदाजे 1 हजार 800 चेन्नईहून पाठवण्यात आले आहेत.

फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात युद्ध सुरु झाल्यापासून, तामिळनाडू बंदरांमधून जहाजांची वाहतूक मंदावली आहे. त्यामुळेच आखाती देशांमध्ये निर्यात करणाऱ्या चिदंबरम बंदरावर, याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या बंदरमार्गे सामान्यतः कपडे, घरगुती कापड, अन्न उत्पादने, अंडी आणि अभियांत्रिकी कास्टिंग यासारख्या वस्तू थेट बाहेरच्या देशांमध्ये पाठवल्या जातात.

Comments are closed.