IRGC ला दहशतवादी संघटना घोषित करा; इस्रायलचे हिंदुस्थानला आवाहन, इराणबाबत व्यक्त केली चिंता
इराणसोबत सुरू असलेल्या तणाव आणि संघर्षविरामाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने हिंदुस्थानला एक मोठे राजनैतिक आवाहन केले आहे. हिंदुस्थानने इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ला (IRGC) दहशतवादी संघटना घोषित करावे आणि तेहरानबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी इस्रायलने केली आहे. आयआरजीसीचा प्रभाव आता केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित राहिला नसून, तो जागतिक सुरक्षेसाठीही चिंतेचा विषय बनला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिंदुस्थानसमोर आयआरजीसीच्या वाढत्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आयआरजीसीच्या कारवायांचा परिणाम आता जगातील इतर भागांमध्येही दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हिंदुस्थानसोबत अनेक राजनैतिक स्तरांवर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच हिंदुस्थानला आयआरजीसीच्या कारवाया आणि त्यांच्या प्रभावाशी संबंधित महत्त्वाची गुप्त माहिती देखील पुरवण्यात आली आहे.
इस्रायलची हिंदुस्थानकडून नेमकी काय अपेक्षा?
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हिंदुस्थानने आयआरजीसीवर कठोर कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे. अनेक देशांनी या दिशेने आधीच पावले उचलली आहेत. जागतिक स्तरावर आयआरजीसीबाबत वाढती चिंता पाहता हिंदुस्थाननेही यावर गांभीर्याने विचार करावा, असे इस्रायलचे म्हणणे आहे. संवादादरम्यान इस्रायली अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियनमधील अनेक सदस्य देशांचाही संदर्भ दिला, ज्यांनी आयआरजीसीशी संबंधित निर्बंध लागू केले आहेत.
दुसरीकडे, इस्रायलने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत हमासबाबतही हिंदुस्थानसमोर अनेकदा आपल्या चिंता व्यक्त केल्या आहेत. हिंदुस्थानने ७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असला तरी, अद्याप हमास किंवा इराणच्या आयआरजीसीला अधिकृतपणे दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले नाही. त्यामुळे इस्रायलच्या या आवाहनावर हिंदुस्थान नेमकी काय भूमिका घेतो, याकडे आता लक्ष लागून आहे.
Comments are closed.