इस्रायलकडून लेबनॉनमध्ये विध्वंस सुरूच; घरांमध्ये स्फोटके पेरून गावे उद्ध्वस्त केली
अमेरिका आणि इराण यांच्यात क्षेपणास्त्रे हल्ले, शाब्दिक चकमकी सुरू असतानाच शांतता करार घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याच वेळी इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील संपूर्ण गावांमध्ये पद्धतशीरपणे विध्वंस करत गावे उद्ध्वस्त केली आहेत. इस्रायली लष्कराने वारंवार असा दावा केला आहे की, हे विध्वंस हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून करण्यात आले होते.
‘द गार्डियन’च्या (The Guardian) वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने गावांच्या घरांमध्ये स्फोटके पेरली आणि त्यानंतर रिमोट-कंट्रोलच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून आणत ती गावे उद्ध्वस्त केली. ‘द गार्डियन’ने इस्रायली लष्कराने स्वतःच प्रसिद्ध केलेले आणि समाजमाध्यमांवर प्रसारित झालेले तीन व्हिडिओ तपासले. या व्हिडिओमध्ये तैबेह (Taybeh), नाकोरा (Naqoura) आणि देइर सेरियन (Deir Seryan) या सीमावर्ती गावांमध्ये अशा प्रकारचे सामूहिक स्फोट घडवून आणले जात असल्याचे दिसून आले.
लेबनॉनमधील प्रसारमाध्यमांनी इतरही काही सीमावर्ती गावांमध्ये अशाच प्रकारचे सामूहिक स्फोट झाल्याचे वृत्त दिले आहे. मात्र, या दाव्यांची पुष्टी करणारी उपग्रह छायाचित्रे उपलब्ध होऊ शकली नाहीत. ‘द गार्डियन’ने नमूद केले आहे की, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सीमावर्ती गावांमधील “सर्व घरे” उद्ध्वस्त करण्याचे जे सार्वजनिक आवाहन केले होते, त्यानंतरच हे विध्वंस करण्यात आले. गाझा पट्ट्यातील राफा (Rafah) आणि बैत हनौन (Beit Hanoun) येथे वापरण्यात आलेल्या पद्धतीचेच अनुकरण करून हे विध्वंस करण्यात आले आहेत.
दक्षिण गाझामधील राफाहमध्ये, इस्रायली सैन्याने ९० टक्के घरे उद्ध्वस्त केली. ‘द गार्डियन’ने नमूद केले आहे की, गाझामधील नागरिकांच्या घरांच्या मोठ्या प्रमाणावरील विध्वंसाच्या याच डावपेचाला अभ्यासकांनी ‘डोमिसाईड’ (domicide) असे म्हटले आहे – म्हणजेच संपूर्ण परिसर राहण्यायोग्य राहणार नाही अशा हेतूने नागरिकांच्या घरांचा हेतुपुरस्सर, पद्धतशीरपणे केलेला विध्वंस आणि नुकसान. या पद्धतीच्या वापरामुळे इस्रायलवर गाझामध्ये नरसंहाराचे आरोप झाले आहेत.
इराण-समर्थित गट हिजबुल्लाहकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये हल्ले आणि जमिनीवरील आक्रमण केले आहे. लेबनॉनच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, शनिवारी देशाच्या दक्षिणेवर झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये १८ जण ठार झाले. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यापासून लेबनॉनमधील इस्रायलच्या कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या २,००० पेक्षा जास्त झाली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, त्यांना लेबनॉनसोबत असा शांतता करार हवा आहे जो “पिढ्यानपिढ्या टिकेल” परंतु हा शांतता करार हिजबुल्लाहला लागू होऊ देत नाही,असे त्यांनी सांगितले.
इस्रायली लष्कराने वारंवार दावा केला आहे की, ही विध्वंसाची कारवाई हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून करण्यात आली होती, ज्यात बोगदे आणि लष्करी तळांचा समावेश आहे, जे या गटाने कथितरित्या नागरिकांच्या घरांमध्ये पेरले होते. इस्रायलने घोषणा केली आहे की ते दक्षिण लेबनॉनचा मोठा भाग ताब्यात घेईल आणि संपूर्ण प्रदेशात लिटानी नदीपर्यंत एक “सुरक्षा क्षेत्र” स्थापित करेल. जोपर्यंत इस्रायलच्या उत्तरेकडील शहरांच्या सुरक्षेची हमी दिली जात नाही, तोपर्यंत विस्थापित रहिवाशांना परतण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामुळे दीर्घकालीन विस्थापनाबद्दल चिंता वाढली आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढत आहे.
Comments are closed.