इस्रायलचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर

नेतान्याहू यांच्या प्रस्तावित दौऱ्यापूर्वी होणार चर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इस्रायलचे विदेशमंत्री गिदोन सार पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. गाझा संकट अद्याप संपलेले नाही आणि पुढील महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचा भारत दौराही प्रस्तावित असल्याने सार यांचा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

स्वत:च्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान इस्रायलचे विदेशमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदींदरम्यान एक व्यक्तिगत स्तरावर मैत्री असल्याने त्यांचा भारत दौरा भूराजकारण पाहता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अजेंड्यात तंत्रज्ञान अन् संरक्षण सामील

भारत दौऱ्यादरम्यान इस्रायलचे विदेशमंत्री गिदोन सार हे तंत्रज्ञान, संरक्षण आणि क्षेत्रीय विकासासोबत अन्य द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. गाझा संकटादरम्यान इस्रायलचे अनेक वरिष्ठ नेते भारत दौऱ्यावर आले आहेत किंवा येणार आहेत. यात गिदोन हे इस्रायलच्या सत्तेत सामील असणारे नवे नेते आहेत.

आयएमईसीवर होणार चर्चा

गिदोन सार आणि जयशंकर यांची म्युनिच सुरक्षा संमेलनादरम्यान भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावावर चर्चा झाली होती. ट्रम्प यांनी आशिया, युरोप आणि अमेरिकेला इस्रायलच्या माध्यमातून जोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता सार यांच्या भारत दौऱ्यात भारत-मध्यपूर्व-युरोप इकोनॉमिक कॉरिडॉरवर (आयएमईसी) देखील चर्चा होणार आहे. हा कॉरिडॉर आशिया, मध्यपूर्व आणि युरोपला जोडणारा एक मोठा प्रकल्प आहे.

नेतान्याहू यांच्या दौऱ्याची पार्श्वभूमी

पुढील महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचा भारत दौराही प्रस्तावित आहे. यानंतर जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये तेथील संरक्षणमंत्री योव गॅलेंट आणि नव्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हरजोग हे भारत दौरा करणार आहेत. अशाप्रकारे मागील दोन वर्षांमध्ये भारतात येणाऱ्या इस्रायलच्या अतिमहत्त्वाच्या नेत्यांची एक मोठी यादी तयार झाली आहे. यात अर्थमंत्री बेजालेला स्मोट्रिच, अर्थव्यवस्था मंत्री निर बरकत, कृषीमंत्री एवी डिशर आणि पर्यटनमंत्री हाइम कात्ज देखील सामील आहेत.

गुंतवणुकीमुळेही संबंध वृद्धींगत

इस्रायलचे अर्थमंत्री बेजालेल स्मोट्रिच सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान दोन्ही देशांनी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी द्विपक्षीय गुंतवणूक  करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराच्या अंतर्गत गुंतवणूक जप्त होण्यापासून वाचविली जाईल तसेच नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे. तर इस्रायलचे अर्थव्यवस्था मंत्री निर बरकत एका मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले होते.

Comments are closed.