इस्त्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांना कर्करोगाचे निदान; आता कशी आहे तब्येत? स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्याला कर्करोगाची लागण झाली होती, याबाबतचा खळबळजनक खुलासा स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून केला आहे. आपली वार्षिक वैद्यकीय चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या अहवालातून त्यांच्या शरीरातील एक घातक ट्यूमर (गाठ) काढण्यात आल्याचे समोर आले होते.

नेतान्याहू काय म्हणाले?

नेतान्याहू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रोस्टेट वाढल्यामुळे त्यांच्यावर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर नियमित वैद्यकीय तपासणी सुरू असताना डॉक्टरांना त्यांच्या शरीरात सुरुवातीच्या टप्प्यातील एक घातक ट्यूमर आढळला. मात्र उपचारानंतर आता ही समस्या पूर्णपणे संपली असून त्याचा कोणताही अंश शिल्लक नसल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले. “मी आता पूर्णपणे निरोगी आहे,” असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

माहिती जाहीर करण्यास उशीर का केला?

आपल्या आरोग्याशी संबंधित रेकॉर्ड सार्वजनिक करण्यास उशीर का केला? याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. नेतान्याहू यांच्या सांगण्यानुसार, ज्यावेळी अमेरिका आणि इस्त्रायलचे इराणसोबतचे युद्ध शिगेला पोहोचले होते, त्याच वेळी ही आरोग्य समस्या समोर आली होती. इराणला इस्त्रायलविरुद्ध कोणताही खोटा प्रोपागांडा किंवा अपप्रचार करण्याची संधी मिळू नये, या उद्देशाने ही माहिती त्यावेळी गोपनीय ठेवण्याची विनंती त्यांनी केली होती.

आपल्या पोस्टमध्ये नेतान्याहू यांनी सांगितले की, २०२४ मध्ये प्रोस्टेटच्या शस्त्रक्रियेनंतर ते नियमित देखरेखीखाली होते. अलीकडच्या तपासणीत एक सेंटीमीटरपेक्षाही लहान गाठ आढळली होती. त्यावर तातडीने उपचार करण्यात आले. ते म्हणाले, “जेव्हा मला संभाव्य धोक्याची माहिती वेळेत मिळते, तेव्हा मी लगेच त्याचे निराकरण करू करतो. ही गोष्ट राष्ट्रीय स्तरावरही लागू होते आणि वैयक्तिक स्तरावरही.”

Comments are closed.