युद्धबंदीत इस्रायलचे बेफाम हल्ले,विश्वासघाताने इराण खवळला… आमचे बोट ट्रिगरवर!
इराण-अमेरिकेमध्ये युद्धविराम झाल्यानंतरही जगाचे टेन्शन कायम आहे. वादाचा केंद्रबिंदू आता होर्मुझवरून लेबनॉनकडे सरकला आहे. युद्धविरामाशी लेबनॉनचा संबंध नसल्याचे सांगत इस्रायलने तिथे बेफाम हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे इराण खवळला आहे. ‘‘हा विश्वासघात आहे. हे असेच सुरू राहिल्यास चर्चेला काडीचा अर्थ उरणार नाही. आमचेही बोट ट्रिगरवर आहे,’’ असा दम इराणने अमेरिका-इस्रायलला भरला. त्यामुळे कोणत्याही क्षणी पुन्हा भडका उडण्याची भीती आहे. दरम्यान, युद्धविरामाच्या करारावर उद्या इस्लामाबादेत पुढील चर्चा होणार असून येणारे काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.
इराणच्या दहा अटींवर चर्चा करण्यास अमेरिका राजी झाल्याने इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध दोन आठवडय़ांसाठी थांबवण्यात आले आहे. मात्र इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला. त्यावर लेबनॉन हा युद्धविरामाच्या कराराचा भाग नव्हता अशी भूमिका अमेरिकेने मांडली. इराणने त्यास तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘‘लेबनॉन आणि इराणचे अन्य सहकारी हा या शस्त्रसंधी कराराचा अविभाज्य भाग आहे. त्यांना आम्ही कधीच अंतर देणार नाही. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे परिणाम अत्यंत गंभीर होतील,’’ असा इशारा इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी दिला. त्यातच अंतिम करार प्रत्यक्षात येईपर्यंत अमेरिकेचे सैन्य, लढाऊ विमाने, जहाजे आखाती प्रदेशांतच तैनात राहतील, असे अमेरिकेने आज स्पष्ट केले. त्यामुळे तणाव कायम आहे.
इस्रायल-लेबनॉन चर्चेत हिजबुल्लाहचा खोडा
इराण-अमेरिका युद्धविरामानंतर आता इस्रायल लेबनॉनमध्ये द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या मंत्रिमंडळाला लेबनॉनशी चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हिजबुल्लाहला निःशस्त्र करण्याची अट इस्रायलने घातली आहे. पुढील आठवडय़ात वॉशिंग्टनमध्ये ही बैठक होण्याची चिन्हे आहेत. मात्र, हिजबुल्लाहने यात खोडा घातला आहे. अशी कुठलीही द्विपक्षीय चर्चा आम्हाला मान्य नसल्याचे हिजबुल्लाहने स्पष्ट केले आहे.
होर्मुझसाठी बॅरलमागे 1 डॉलर टोल
दिवसाला फक्त 15 जहाजांना होर्मुझ ओलांडण्याची परवानगी दिली जाणार असून प्रत्येक बॅरलमागे एक डॉलर टोल घेतला जाणार आहे, असे इराणने स्पष्ट केले.
पाकिस्तानात आज वाटाघाटी
इराण-अमेरिकेचे शिष्टमंडळ शुक्रवारी इस्लामाबादेत पोहोचणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादला छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांसह लष्कराचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. या हॉटेलचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. अमेरिकेचे 30 सदस्यीय पथक सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आधीच इस्लामाबादेत पोहोचले आहे.
Comments are closed.