इस्रो एक राक्षस रॉकेट तयार करीत आहे

75 टनापर्यंत भार वाहून नेण्यास सक्षम : 40 मजली इमारतीसमान असणार उंची

सर्कल संस्था/हैदराबाद

इस्रो पुन्हा एकदा स्वत:चे कौशल्य दाखवून देत जगाला चकित करण्याच्या तयारीत आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी 40 मजली इमारतीइतका उंच विशाल रॉकेट तयार केला जात असल्याची घोषणा केली आहे. 75 हजार किलोग्रॅम (75 टन) वजन पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत (लो-अर्थ ऑर्बिट)मध्ये नेण्यास हा रॉकेट सक्षम असणार आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी हे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात या नव्या रॉकेटविषयी सांगितले आहे. हा रॉकेट अत्यंत विशाल असेल आणि याची उंची 40 मजली इमारतीसमान असणार आहे. हा रॉकेट 75 टन वजनाच्या उपग्रहाला लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित करू शकणार आहे. लो अर्थ ऑर्बिट पृथ्वीपासून 600-900 किलोमीटरच्या उंचीवर असते, जेथे संचार-देखरेख उपग्रह स्थापित केले जातात.

नारायणन यांनी या नव्या रॉकेटची तुलना भारताच्या पहिल्या रॉकेटसोबत केली आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यावेळी तयार केलेला रॉकेट (एसएलव्ही-3) केवळ 17 टन वजनाचा होता. तसेच तो 35 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह कक्षेत नेऊ शकत होता. तर इस्रोचा नवा रॉकेट त्याहून 2 हजार पट अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता बाळगणारा असेल. तसेच तो भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची प्रगती दर्शविणारा आहे.

रॉकेट विशेष?

75 टनाचा पेलोड वाहू नेणे अत्यंत मोठी कामगिरी ठरणार आहे. सध्या इस्रोचा सर्वात अवजड रॉकेट एलव्हीएम3 असून तो 10 हजार किलोग्रॅम पर्यंतचा पेलोड लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेऊ शकतो. नवा रॉकेट याहून 7 पट अधिक वजन वाहून नेऊ शकणार आहे. या रॉकेटमध्ये इस्रोच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यातून भारताची अंतराळक्षेत्रातील वाढती विश्वसनीयता दिसून येते. हा रॉकेट सैन्य संचार, पृथ्वी अवलोकन आणि दिशानिर्देशन यासारख्या क्षेत्रांमध्ये भारताचे सामर्थ्य वाढविणारा ठरेल. इस्रो यापूर्वीच नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल (एनजीएलव्ही)वर काम करत असून यात पहिला टप्पा पुनर्वापरयोग्य असेल, हा नवा रॉकेट देखील या दिशेने पहिले पाऊल ठरू शकते.

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची प्रगती

भारताचे सध्या 55 उपग्रह कक्षेत कार्यरत आहेत. पुढील 3-4 वर्षांमध्ये ही संख्या तीनपट होणार आहे. याचा अर्थ 2029 पर्यत भारताकडे जवळपास 165 उपग्रह असतील. हे उपग्रह संचार, हवामान, दिशादर्शन आणि सैन्यगरजांसाठी काम करणार आहेत. अधिक वजनाच्या उपग्रहाला प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताला अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या निवडक देशांच्या श्रेणीत सामील करणार आहे. तसेच  विदेशी उपग्रहांना प्रक्षेपित करण्यात आल्यास इस्रोला मोठे उत्पन्नही मिळणार आहे.

 

Comments are closed.