तांत्रिक स्नॅगमुळे इस्रोच्या 101 व्या मिशनने

ईओएस-09 उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी : तिसऱ्या टप्प्यात समस्या : इस्रो प्रमुखांकडून निवेदन जारी

Vrtasantha/ श्रीहारीकोटा

इस्रोला आपल्या 101 व्या ऐतिहासिक प्रक्षेपणादरम्यान मोठा धक्का बसला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे 101 वे अभियान ईओएस-09 प्रक्षेपणानंतर अयशस्वी झाले, असे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले. उ•ाणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक समस्या उद्भवल्याने मोहीम पूर्ण होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. यासंबंधी भारतीयांनी सोशल मीडियावर याविषयी प्रतिक्रिया देताना आपण इस्रोच्या पाठिशी उभे असल्याचे म्हटले आहे. तसेच, इस्रो पुन्हा ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करेल, असा विश्वासही लोकांनी व्यक्त केला आहे. इस्रोने आतापर्यंत अनेक मोठ्या कामगिरी यशस्वीपणे पूर्ण केल्या असून यापुढेही करत राहील, असे म्हणत देशाच्या नागरिकांनी इस्रोसोबत असल्याचे म्हटले आहे.

इस्रोने रविवारी सकाळी 5.59 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन ‘पीएसएलव्ही-सी61’द्वारे आपला 101 वा उपग्रह ईओएस-09 (पृथ्वी वेधशाळा उपग्रह) प्रक्षेपित केला, परंतु हे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही. मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इस्रो रविवारी पीएसएलव्ही-सी61 रॉकेटद्वारे पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करू शकला नाही. याची चौकशी केली जात आहे, असे अंतराळ संस्थेचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले.

इस्रोने पूर्वनियोजनानुसार पीएसएलव्ही-सी61 लाँच करण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेत चार टप्पे असतात. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये कामगिरी अपेक्षेप्रमाणे होती. तिसऱ्या टप्प्यात आम्हाला समस्या जाणवल्यामुळे मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. आम्ही संपूर्ण कामगिरीचा अभ्यास करत आहोत, आम्ही शक्य तितक्या लवकर परत येऊ. तसेच, पुन्हा अधिक जोमाने प्रयत्न केले जातील, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

शत्रू राष्ट्रांवर देखरेख ठेवण्यासाठी

ईओएस-09 म्हणजेच अर्थ ऑब्झर्व्हेटरी सॅटेलाईट हा सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडार तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला एक प्रगत निरीक्षण उपग्रह आहे. ते दिवसा आणि रात्री कोणत्याही हवामानात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा कॅप्चर करू शकते. ही क्षमता अनेक क्षेत्रांमध्ये भारताच्या देखरेख आणि व्यवस्थापन प्रणालींना बळकटी देते. पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि पाकिस्तानला त्याची जागा दाखवल्यानंतर, भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि कोणत्याही अपवित्र कृत्याला रोखण्यासाठी सतर्क असल्याचेही इस्रोच्या प्रमुखांनी सांगितले. ईओएस-09 विशेषत: घुसखोरी किंवा संशयास्पद क्रियाकलाप शोधण्यासाठी डिझाईन केलेले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादविरोधी कारवायांसाठी हे महत्त्वाचे मानले जात आहे.

अपयश शोधण्यासाठी समिती स्थापन

ईओएस-09 पृथ्वी निरीक्षण उपग्रह 524 किमीच्या सूर्य-समकालिक ध्रुवीय कक्षेत ठेवला जाणार होता. हे इस्रोचे 101 वे प्रक्षेपण अभियान होते. अपयशाची कारणे शोधण्यासाठी इस्रोने एक समिती स्थापन केली आहे. इस्रोच्या मते, तिसऱ्या टप्प्यातील प्रज्वलन सामान्यत: 262.9 सेकंदात झाले. सुरुवातीच्या डेटामध्ये सर्व काही ठीक दिसत होते. या काळात रॉकेटची उंची 344.9 किलोमीटर होती, वेग 5.62 किमी/सेकंद होता आणि पल्ला 888.4 किलोमीटर होता. तथापि, 376.8 सेकंदांनंतर, टेलीमेट्री डेटामध्ये विसंगती दिसू लागल्या, असे स्पष्टीकरण इस्रोकडून देण्यात आले आहे.

Comments are closed.