इस्रोची चमकदार कामगिरी
‘स्पॅडेक्स’ची डी-डॉकिंग प्रक्रिया पूर्ण : आता चांद्रयान-4, गगनयान मोहिमांचा मार्ग सुकर
भविष्यातील वेध…
- जोडलेल्या अंतराळयानांमध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरणाच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आजमावणे
- ‘स्पॅडेक्स’ मोहिमेद्वारे अंतराळात स्वत:चे अंतराळस्थानक बनवण्याचा भारताचा मार्ग सुकर होणार
वृत्तसंस्था/बेंगळूर, नवी दिल्ली
इस्रोने अवकाशात एक देदिप्यमान कामगिरी नोंदवत मोठी कमाल केली आहे. ‘स्पॅडेक्स’च्या स्पेस डॉकिंग प्रयोगांतर्गत यशस्वी डी-डॉकिंग झाल्याची पुष्टी इस्रोकडून गुरुवारी करण्यात आली. या कामगिरीमुळे भविष्यातील चांद्रयान-4, गगनयान आणि इतर मोहिमांसाठीचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली.
‘स्पॅडेक्स’ उपग्रहांचे यशस्वी डी-डॉकिंग भारताच्या अंतराळ क्षमतेसाठी एक मोठी झेप मानली जात आहे. या क्षमतेमुळे भारतीय अंतराळ स्थानक आता चांद्रयान 4 आणि गगनयानसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी अधिक मजबुतपणे काम करण्यास सज्ज झाले आहे. इस्रोने गुरुवार, 13 मार्च 2025 रोजी या कामगिरीविषयी सविस्तर माहिती दिली. ‘स्पॅडेक्स’ उपग्रहांचे डी-डॉकिंग पूर्ण केल्यामुळे भविष्यातील मोहिमांचा मार्ग मोकळा झाला असून आता भारताचे स्वत:चे अंतराळस्थानक बांधणेही साध्य होईल, असे इस्रोने म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून उपग्रहांचे यशस्वी डी-डॉकिंग पूर्ण झाल्याचे जाहीर केले. ‘स्पॅडेक्स उपग्रहांनी अविश्वसनीय डी-डॉकिंग पूर्ण केले आहे. यामुळे भारतीय अंतराळ स्थानक चांद्रयान-4 आणि गगनयान यासारख्या भविष्यातील महत्त्वाकांक्षी मोहिमांच्या सुरळीत संचालनाचा मार्ग मोकळा होतो, असे जितेंद्र सिंह म्हणाले. त्याव्यतिरिक्त जोडलेल्या अंतराळयानांमध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरणाच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आजमावणेही शक्य होणार आहे.
इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘एक्स’वर इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. ‘इस्रोने केलेली उल्लेखनीय कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी आनंदाची गोष्ट आहे’ असे म्हणाले. तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सततचे पाठबळ उत्साहात भर घालते’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
डी-डॉकिंग प्रक्रिया म्हणजे काय?
‘स्पॅडेक्स’ मोहिमेत बंदुकीतील गोळीच्या वेगापेक्षा दहापट वेगाने अंतराळात प्रवास करणारी दोन यान एकत्र जोडण्यात आली. दोन यान एकत्र जोडण्याच्या या प्रक्रियेलाच ‘डॉकिंग’ असे संबोधले जाते. त्याउलट ही दोन यान पुन्हा विभक्त करण्याच्या प्रक्रियेला ‘डी-डॉकिंग’ असे म्हटले जाते. भारताची चांद्रयान-4 मोहीम या मोहिमेच्या यशावर अवलंबून असून याद्वारे चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी मदत होणार आहे.
डिसेंबर 2024 मध्ये स्पॅडेक्स मिशनचे प्रक्षेपण
‘स्पॅडेक्स’ मोहीम 30 डिसेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आली होती. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘स्पॅडेक्स’ मिशनचे प्रक्षेपण करण्यात आले. ही यान पीएसएलव्ही-सी60 रॉकेटमधून 470 किमी उंचीवर वेगळ्या कक्षेत सोडण्यात आली. यानंतर, 16 जानेवारी रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एसडीएक्स-1 आणि एसडीएक्स-2 हे दोन उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या लॉक केले. त्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर अंतराळ डॉकिंग यशस्वीरित्या साध्य करणारा भारत जगातील चौथा देश बनला होता. त्यानंतर आता या मोहिमेतील पुढचा टप्पा म्हणजे डी-डॉकिंगही पूर्ण करण्यात आले आहे.
मिशनचे फायदे
भारत 2035 पर्यंत स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. भारतीय अंतराळ स्थानकात 5 मॉड्यूल असतील. ही मॉड्यूल अंतराळात एकत्र आणली जातील. यापैकी पहिले मॉड्यूल 2028 मध्ये लाँच होणार आहे. मानवी अंतराळ उ•ाणांसाठीही मिशन चांद्रयान-4 महत्त्वाचे आहे. या प्रयोगामुळे उपग्रहाची दुरुस्ती, त्यात इंधन भरणे आणि कचरा काढून टाकण्याची प्रक्रियाही राबविली जाईल.
भारताने मिळविले डॉकिंग यंत्रणेचे पेटंट
‘स्पॅडेक्स’ या डॉकिंग यंत्रणेला ‘इंडियन डॉकिंग सिस्टम’ असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने या डॉकिंग प्रणालीचे पेटंटही घेतले आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या अंतराळ संस्थेने या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा तपशील शेअर न केल्यामुळे भारताने स्वत:ची डॉकिंग यंत्रणा विकसित केली आहे.
Comments are closed.