देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोची महत्त्वाची पायरी
3 वर्षांमध्ये 100 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी : सीमा सुरक्षा मजबूत करणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी भारत आगामी तीन वर्षांमध्ये 100-150 नवे उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा केली आहे. या उपग्रह प्रक्षेपणाचा मुख्य उद्देश सीमा सुरक्षा आणि किनारी भागांच्या देखरेखीला आणखी मजबूत करणे आहे. सध्या देशाकडे सुमारे 55 उपग्रह आहेत, परंतु एक विशाल किनारा (7500 किलोमीटर लांब) आणि लांब सीमा असलेल्या देशासाठी हे प्रमाण पुरेसे नाही. याचमुळे भारताला आणखी उपग्रहांची गरज असल्याचे नारायणन यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंतराळ क्षेत्रात घडवून आणलेल्या सुधारणांमुळे आता खासगी कंपन्या देखील उपग्रह आणि रॉकेट निर्मिती कार्यात भाग घेऊ शकतात, यामुळे इस्रोला वेगाने नवी मोहीम पूर्ण करण्यास मदत मिळणार आहे. या उपग्रहांच्या मदतीने आम्ही देशाच्या सीमांवर पूर्णपणे देखरेख ठेवू शकणार आहोत असा दावा नारायणन यांनी केला आहे. इस्रोने अलिकडेच स्वत:च्या स्पॅडेक्स मिशनच्या अंर्तत उपग्रहांना अंतराळात यशस्वीपणे डॉक आणि अनडॉक केले आहे. हे एक मोठे तांत्रिक यश असून ही कामगिरी करणाऱ्या निवडक देशांच्या गटात भारत सामील झाला असल्याचे उद्गार इस्रो प्रमुखांनी काढले आहेत.
हवामान बदलाचे अध्ययन
इस्रो आता हवामान बदलाचे अध्ययन करणारा एक खास उपग्रह निर्माण करत आहे. याचा निम्मा हिस्सा भारत तयार करणार आहे. तर उर्वरित हिस्स्याच्या निर्मितीत जी-20 देशांचे योगदान असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Comments are closed.