तामिळनाडूमध्ये इस्रोचा नवीन लाँचपॅड तयार केला जात आहे

कुलसेकरपट्टणम येथे 2300 एकरमध्ये फैलावलेला परिसर : डिसेंबर 2026 पासून होणार  प्रक्षेपण

वृत्तसंस्था/कुलसेकरपट्टणम

भारताचा अंतराळ कार्यक्रम आता नवी उंची गाठत आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा नंतर तामिळनाडूच्या तूतीकोरिन जिल्ह्यातील कुलसेकरपट्टणममध्ये देशाचा दुसरा मोठा लाँच कॉम्प्लेक्स तयार केला जात आहे. इस्रोप्रमुख व्ही. नारायणन यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यावर डिसेंबर 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची घोषणा केली आहे. या विशाल कॉम्प्लेक्सला 2300 एकर जमिनीवर विकसित केले जात आहे. येथून दरवर्षी सुमारे 20-25 रॉकेट्स प्रक्षेपित होतील. खास बाब म्हणजे येथून छोटे उपग्रह प्रक्षेपक (एसएसएलव्ही) झेपावतील, जे 500 किलोपर्यंतचा पेलोड 400 किलोमीटरच्या उंचीपर्यंत पोहोचवू शकतात. डिसेंबर 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. पुढील वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत येथून पहिले प्रक्षेपण करण्याची योजना आम्ही आखत आहोत. पंतप्रधान योग्यवेळी प्रक्षेपणाच्या तारखेची घोषणा करतील असे नारायणन यांनी म्हटले आहे.

का आवश्यक होता नवा स्पेसपोर्ट?

आतापर्यत इस्रोचे मुख्य लाँच सेंटर श्रीहरिकोटा राहिले आहे, जेथून 1971 पासून पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही यासारखे मोठ प्रक्षेपक झेपावत राहिले आहेत. परंतु छोटे प्रक्षेपक खासकरून एसएसएलव्हीसाठी तेथून पोलर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपण करणे अवघड आहे. याचे कारण श्रीलंका आहे. श्रीहरिकोटाहून थेट दक्षिणेकडे प्रक्षेपण केल्यास रॉकेट श्रीलंकेवरून झेपावतात. या धोक्यापासून वाचण्यासाठी प्रक्षेपकांना ‘डॉगलेग मॅन्युवर’ करावे लागते. म्हणजेच प्रथम पूर्व दिशेने वळणे आणि मग दक्षिणेकडे झुकावे लागते. हा प्रकार छोट्या प्रक्षेपकांसाठी अत्यंत महाग ठरतो, कारण यात अधिक इंधन वापरले जाते आणि पेलोडची क्षमताही कमी होते. याचमुळे कुलसेकरपट्टणमची निवड करण्यात आली आहे.

कुलसेकरपट्टनमाचचा?

कुलसेकरपट्टणम समुद्रकिनाऱ्यावर स्थित असून येथून थेट दक्षिणेच्या दिशेने प्रक्षेपक झेपावू शकतात. तेथून हजारो किलोमीटरपर्यंत केवळ महासागर आहे, कुठलीच नागरी वस्ती नाही. याचा लाभ म्हणजे प्रक्षेपक थेट पोलर ऑर्बिटच्या दिशेने झेपावेल, तेही अतिरिक्त इंधन न वापरता. या पावलामुळे छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा खर्च खूप कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिस्पर्धा आणखी वाढेल असे इस्रोचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. या लाँच कॉम्प्लेक्सद्वारे छोट्या उपग्रहांचे व्यावसायिक प्रक्षेपणही होईल. भारताच्या खासगी अंतराळ कंपन्यांनाही येथून प्रक्षेपण करण्याची सुविधा मिळेल. यामुळे देशाच्या अंतराळ कार्यक्रमाला मोठा वेग मिळणार आहे.

सामरिक दृष्टी

हा प्रकल्प केवळ तांत्रिक नव्हे तर रणनीतिक दृष्टीकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. भारत आता छोट्या उपग्रहांची जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी चांगल्या स्थितीत असेल. श्रीहरिकोटा येथून मोठे प्रक्षेपक झेपावतील अणि कुलसेकरपट्टणम येथून छोटे उपग्रह. इस्रोचा हाच भविष्यासाठी आराखडा आहे. डिसेंबर 2026 पासून येथून प्रक्षेपक अंतराळात झेपावू लागल्यावर भारताच्या अंतराळ यात्रेचा नवा अध्याय लिहिला जाईल असे उद्गार इस्रो प्रमुख नारायणन यांनी काढले आहेत.

Comments are closed.