Asia Cup Final: मोहसिन नकवींकडून ट्रॉफी न घेतल्याच्या वादावर कुलदीप यादवची प्रतिक्रिया! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?
भारताने दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानला आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 5 गडी राखून पराभूत केले. या विजयासह भारताने नवव्यांदा आशियाई विजेतेपद पटकावले. मात्र टीम इंडिया जिंकूनही तिला ट्रॉफी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कदाचित ही पहिलीच वेळ असेल की विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. भारताने आशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे संतापलेल्या नकवींनी आशिया कपची ट्रॉफी घेऊन मैदान सोडले.
या विजयात कुलदीप यादवची (Kuldeep yadav) महत्त्वाची भूमिका होती. अंतिम सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या आणि भारताला पुनरागमन करवून दिले . एका टप्प्यावर पाकिस्तानने एक गडी गमावून 112 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर कुलदीपच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने जोरदार पुनरागमन केले आणि संपूर्ण पाकिस्तानी संघ 146 धावांवर गुंडाळला. भारत विजेता झाल्यानंतर कुलदीप यादवने एनडीटीव्हीला खास मुलाखत दिली आणि ट्रॉफी वादावर आपले मत मांडले.
ट्रॉफी वादाबद्दल कुलदीप यादव म्हणाला, “मला फारसं माहिती नाही. जेव्हा तुम्ही सामना खेळता तेव्हा सर्वप्रथम आपल्या संघाकडे पाहता. तुमची टीम कशी आहे, ती मैदानावर उतरते तेव्हा चांगली क्रिकेट खेळावी, निडर क्रिकेट खेळावी हेच पाहता. जेवढं तुमच्या संघाचं बळ आहे, जेवढं संघाने वर्षानुवर्षे कमावलं आहे, ते मानक खाली जाऊ नये, हेच डोळ्यासमोर ठेवून तुम्ही खेळता. बाकी निकाल वर-खाली होतच असतात. आमच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने खेळ केला, त्यात बरेच सामने चुरशीचे झाले. कालचाही सामना खूपच टोकाचा होता.
पाकिस्तानला सलग तीन वेळा हरवल्याबद्दल कुलदीप यादव म्हणाला, आम्ही नेहमी आमच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करतो. आमचं क्रिकेट अधिक चांगलं कसं होईल, कशी सुधारता येईल यावर विचार करतो. प्रत्येक सामना ही एक नवं आव्हान असते. कधी अपयश येते, कधी यश मिळते. शेवटच्या सामन्यात आम्हाला यश मिळालं आणि एक संघ म्हणून आम्ही साध्य केलं.
कुलदीप पुढे म्हणाला, अशा क्षणांतूनही काही शिकायला मिळतं. शेवटचा सामना खूप काही शिकवून गेला. आम्ही खूप आनंद घेतला. सर्व सामने छान झाले. आम्ही जे विचार करतो, जे बोलतो आणि आमच्या संघाची जे तत्वज्ञान आहे त्यावर आम्ही ठाम राहिलो. पूर्ण स्पर्धेत आम्ही अतिशय चांगले क्रिकेट खेळलो.
Comments are closed.