यानिक सिनरचा डबल धमाका, चायना ओपनः अमेरिकेच्या लर्नर टिएनला सरळ सेटमध्ये नमवले

इटलीच्या यानिक सिनरने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या लर्नर टिएनचा पराभव करून चायना ओपनमध्ये विजयाचा डबल धमाका केला. सिनरने अमेरिकेच्या 19 वर्षीय लर्नरवर 6-2, 6-2 अशा फरकाने मात करून दुसऱ्यांदा चायना ओपनचे विजेतेपद पटकावले. जगातील अव्वल मानांकित सिनरने अवघ्या 34 मिनिटांत पहिला सेट जिंकला आणि दुसऱ्या सेटमध्येही वर्चस्व राखत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
लर्नर टिएनने सुरुवातीला कडवे आव्हान देताना सामन्यात रंगत आणली, मात्र अनुभवी यानिक सिनरने पाचव्या आणि सातव्या गेममध्ये त्याची सर्व्हिस ब्रेक करत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. 24 वर्षीय सिनरने 1 तास 12 मिनिटांत सरळ सेटमध्ये विजय मिळवला. सलग तिसऱ्यांदा फायनल खेळलेल्या सिनरने यापूर्वी 2023 मध्ये कार्लोस अल्काराझ आणि डॅनिल मेदवेदेव यांना चीतपट करून बाजी मारली होती तर गतवर्षी तो उपविजेता ठरला होता.
Comments are closed.