आयटीएफ पुरुष टेनिस स्पर्धा – सिद्धार्थ-फिलीप जेतेपदासाठी भिडणार, दुहेरीत जीवन-रामकुमार जोडीला विजेतेपद
भारताचा सिद्धार्थ रावत व फ्रान्सचा फिलीप सेकुलिक यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आयटीएफ पुरुष टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत जीवन नेदुसेझियान व रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीने विजेतेपदाला गवसणी घातली.
एकेरीच्या पहिल्या उपांत्य लढतीत हिंदुस्थानच्या बिगरमानांकित सिद्धार्थ रावतने अव्वल मानांकित फ्रान्सच्या फ्लोरेंट बॅक्सचा टायब्रेकमध्ये ६-२, ६-७ (३), ६-३ असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना ३ तास ५ मिनिटे चालला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या पाचव्या मानांकित फिलीप सेकुलिक याने स्वीडनच्या लिओ बोर्गचा ५-७, ६-४, ६-१ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत अंतिम फेरीत हिंदुस्थानच्या जीवन नेदुसेझियान व रामकुमार रामनाथन या अव्वल मानांकित जोडीने स्वीडनच्या लिओ बोर्ग व युक्रेनच्या युरी इवाकियान यांचा ६-३, ६-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक व २५ गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक व १४ गुण, अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे चेअरमन भरत ओझा, एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक सुप्रीत कडवागिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.