8 महिने झाले तरीही मोहम्मद शमीचं टीम इंडियात पुनरागमन नाही, दरम्यान बीसीसीआय कडून मोठा खुलासा समोर
मोहम्मद शमी (Mohmmed Shami) चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अजूनपर्यंत टीम इंडियात परतलेला नाही. एका बाजूला शमी म्हणतो की, तो पूर्णपणे फिट आहे, तर दुसऱ्या बाजूला मुख्य निवडकर्ते अजीत अगरकर (Ajit Agarkar) यांनी सांगितलं होतं की, शमी पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याची निवड करण्यात आलेली नाही.
इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही शमीची निवड झाली नव्हती, आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीही त्याला संघात स्थान मिळालेलं नाही. या पार्श्वभूमीवर शमीच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
न्यूज एजन्सी PTIच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, अनेक वेळा निवडकर्ते आणि बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधील सपोर्ट स्टाफ यांनी मोहम्मद शमीच्या फिटनेसची माहिती घेतली आहे. निवड समिती त्याला इंग्लंड दौऱ्यामध्ये घेण्यासाठी इच्छुक होती, कारण जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) तीनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळणार नव्हता. इंग्लंडसारख्या परिस्थितीत शमीसारखा गुणवत्तापूर्ण गोलंदाज कोण नको म्हणेल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मात्र या मालिकेसाठीदेखील मोहम्मद शमीचा टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये समावेश झालेला नाही. यावर एका सूत्राने सांगितलं, असं एक कथानक तयार करण्यात आलं की शमीशी कोणताही संपर्क साधला गेला नाही, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. स्पोर्ट्स सायन्स टीमकडे त्याच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल आहेत, जे दर्शवतात की शमी आंतरराष्ट्रीय सामन्यांचा ताण झेलू शकेल की नाही.
दरम्यान, मोहम्मद शमीने घरेलू कसोटी स्पर्धा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलं आहे. बंगालकडून खेळताना त्याने आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये विजयी कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामातील फक्त दोन सामन्यांतच शमीने तब्बल 15 बळी घेतले आहेत.
Comments are closed.