जेकब डफीचा आयपीएलमध्ये धमाकेदार डेब्यू! हैदराबादच्या धुरंधर फलंदाजांना गुंडाळत हेझलवूडची उणीव भरून….
आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात, आरसीबीच्या एका नवख्या वेगवान गोलंदाजाने आपल्या कामगिरीची जबरदस्त छाप पाडली आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीने आपल्या आयपीएल पदार्पणाच्याच सामन्यात सनसनाटी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्विंग आणि उसळी यांचा अप्रतिम मेळ साधत त्याने हैदराबादच्या आक्रमक फलंदाजांना अक्षरशः कोंडीत पकडले. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांना त्याच्या शॉर्ट-पिच आणि अनपेक्षित चेंडूंचा अजिबात अंदाज घेता आला नाही.
या दोन्ही फलंदाजांना बाद करून डफीने सनरायझर्स संघाला मोठा धक्का दिला. त्यानंतर, त्याने नितीश कुमार रेड्डीलाही तंबूत परत पाठवले. डफीचा उत्कृष्ट गोलंदाजीचा लयीतील खेळ पाहून, कर्णधार रजत पाटीदारने त्याच्या गोलंदाजीचा संपूर्ण कोटा पॉवरप्लेमध्येच पूर्ण करून घेण्याचा निर्णय घेतला.
आपल्या चार षटकांच्या गोलंदाजीत, डफीने केवळ २२ धावा देत तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवले. त्याने ५.५० चा इकोनॉमी रेट राखला शिवाय तो केवळ एकच वाईड चेंडू टाकला. पदार्पणाच्या सामन्यातील त्याची ही कामगिरी आरसीबी संघासाठी अत्यंत दिलासादायक ठरली आहे.
दरम्यान, आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावामध्ये आरसीबीने डफीला २ कोटी रुपयांच्या रकमेला आपल्या संघात सामील करून घेतले होते. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असल्याने डफीला खेळण्याची संधी मिळाली. ज्यात त्याने या संधीचे सोने केले.
पहिल्या डावात खेळताना हैदराबादने 20 षटकात 201 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ईधान किशन (80) अनिकेत वर्मा (43) यांनी मोलाची कामगिरी केली. हंगामातील पहिल्या विजयासाठी आरसीबीसमोर 202 धावांचे लक्ष्य आहे.
Comments are closed.