शंकर शेठ नव्हे, जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्टेशन; भूमिगत स्थानकाच्या नावात दुरुस्ती करा, नाना शंकरशेट प्रतिष्ठानची मागणी

मेट्रो 3 भूमिगत मेट्रो रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रलजवळील स्थानकाचे नाव जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो असे करण्यात आले आहे. शंकर शेठ हा उल्लेख चुकीचा असून त्याची दुरुस्ती करून ते जगन्नाथ (नाना) शंकरशेट मेट्रो स्थानक असे करावे, अशी मागणी नाना शंकरशेट प्रतिष्ठानने केली आहे.

पुलाबा ते वरळी अशा भूमिगत मेट्रो मार्गाचे नुकतेच उद्घाटन झाले. या मेट्रो मार्गावरील मुंबई सेंट्रलजवळील स्थानकाला मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नाना शंकरशेट यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र मेट्रो स्थानकाचा फलक आणि मेट्रोतील स्थानकांच्या नामावलीत नाना शंकर शेठ असा उल्लेख करण्यात आला आहे. ही बाब सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटणकर यांनी नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांच्या निदर्शनास आणताच चोणकर यांनी मुंबई मेट्रो रेलच्या कार्यकारी संचालक अश्विनी भिडे यांची भेट घेतली. नाना शंकरशेट हे लोकोत्तर पुरुष होते. त्यामुळे मेट्रो स्थानकावरील जगन्नाथ शंकर शेठ हा उल्लेख बदलून तत्काळ जगन्नाथ (नाना) शंकरशेट अशी दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.

माहिती फलक लावा

नाना शंकरशेट हे मुंबईचे आद्य शिल्पकार आहेत. त्यांनी आधुनिक मुंबई घडवली. रेल्वे ही त्यांचीच देणगी आहे. म्हणून जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकावर नानांच्या कार्याची माहिती देणारा संक्षिप्त फलक लावावा, जेणेकरून नानांच्या उत्तुंग कार्याची माहिती अधोरेखित होईल, अशी मागणीही अॅड. चोणकर यांनी केली आहे.

Comments are closed.