लक्षात ठेवा – धर्मनिरपेक्ष नेहरू

>> जगदीश कब्रे

पं. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या राष्ट्रनिर्मितीत त्यांचा वाटा किती मोठा आहे, हे वेगळे सांगायला नकोच. त्यांची विचारसरणी, राजकीय धोरणे आणि समाजातील विविधतेला दिलेली मान्यता त्यांना खऱया अर्थाने धर्मनिरपेक्ष नेते ठरवतात. त्यांच्या धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारताच्या घटनात्मक मूल्यांमध्ये गुंफलेली आहे. नेहरू यांची धर्मनिरपेक्षता ही केवळ धर्मापासून राजकारण वेगळे ठेवण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती समाजातील सर्व धर्म, पंथ आणि जाती-जमातींना समान अधिकार आणि सन्मान देण्यावर आधारलेली होती. त्यांना असा भारत हवा होता की, जेथे कोणत्याही व्यक्तीला धर्माच्या आधारे भेदभावाचा सामना करावा लागणार नाही. 27 मे हा पं. नेहरूंचा 64 वा पुण्यतिथी दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना दिलेला हा उजळा…

पं. नेहरूंच्या मते, धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय असावा. राज्यकारभार किंवा सामाजिक व्यवस्थेत त्याचा अडथळा होता कामा नये. त्यांनी धर्माला वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित ठेवण्याची भूमिका घेतली, परंतु ते धर्माचे महत्त्व नाकारत नव्हते. त्यांच्या मते, धर्म आणि संस्कृती या व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्या तरी राज्यव्यवस्था धर्माच्या प्रभावाखाली राहता कामा नये. त्यांनी धार्मिक विद्वेषाला आळा घालण्यासाठी कायद्यांचा आधार घेतला, पण त्याचबरोबर धार्मिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी संवादालाही महत्त्व दिले. ते नेहमी म्हणायचे की, धर्माचा राजकारणात हस्तक्षेप म्हणजे समाजातील तणाव वाढवण्याचे साधन बनते. त्यामुळे त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्यावर भर दिला. जिथे प्रत्येक व्यक्तीला आपले धर्मपालन करण्याचे स्वातंत्र्य असते, पण ते इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही. नेहरूंच्या काळातही आणि त्यानंतरही त्यांची धर्मनिरपेक्ष विचारधारा अनेकदा आव्हानांना सामोरी गेली. काही जणांनी त्यांची धर्मनिरपेक्षता ही धर्मविरोधी असल्याचा आरोप केला, तर काहींनी त्यांना हिंदू धर्माला दुय्यम स्थान देणारे नेते मानले. मात्र नेहरूंनी नेहमीच स्पष्ट केले की, त्यांची भूमिका कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हती, तर ती सर्व धर्मांना समान मानणारी होती. नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेला पुढे राजकीय स्वार्थ, धार्मिक ध्रुवीकरण आणि सामाजिक तणावामुळे अडचणी आल्या. आजही त्यांची विचारधारा काही ठिकाणी आदर्श म्हणून घेतली जाते, तर काही ठिकाणी तिच्यावर टीका होते.

नेहरूंनी भारतीय समाजातील विविधता ओळखली होती आणि ती जपण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहीत होते की, भारतात अनेक धर्म, जाती, भाषा आणि संस्कृतींचे अस्तित्व आहे. या विविधतेतच एकता आहे, हेच भारताचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन न देता सर्वांना समान न्याय देण्याचा आग्रह धरला. म्हणून नेहरूंच्या धोरणांमध्ये धर्मनिरपेक्षतेचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते. ते संविधानात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. ते संविधानातील मूलभूत अधिकारांमध्ये धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे अंतर्भूत करण्यासाठी कटिबद्ध होते. त्याचप्रमाणे लोकांनी अंधश्रद्ध राहू नये म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश त्यांनी संविधानातील मूलभूत कर्तव्यांत केला. नेहरूंनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार फक्त राजकीय भाषणांत नव्हे, तर कृतीतून सिद्ध केला. त्यांनी एक असा भारत घडवायचे स्वप्न पाहिले की, इतर धर्मांचा आदर करत जिथे प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माची उपासना सहज करता येईल. नेहरूंची हीच विचारसरणी आजही भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वांमध्ये जिवंत आहे.

त्यांनी भारतात अशी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था तयार केली की, जी कोणत्याही धार्मिक शिकवणुकीपासून स्वतंत्र होती. यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन विकसित करणे, शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समतेची (समरसतेची नव्हे. कारण समरसतेमध्ये समाजातील उतरंड आहे तशीच ठेवून समाजातील लोकांनी सामील होणे असा अर्थ समाविष्ट आहे, जो समानतेच्या विचाराला छेद देणारा आहे.) भावना निर्माण करणे आणि अंधश्रद्धा, जातीयवाद यांसारख्या समाजातील विघातक प्रवृत्तींचा प्रतिकार करणे यावर भर होता.

जवाहरलाल नेहरूंनी ज्या धर्मनिरपेक्षतेचा पाया घातला, ती आजच्या भारताच्या स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या संकल्पनेला बळ देते. त्यांचा वारसा भारतीय लोकशाहीच्या धर्मनिरपेक्ष मूलतत्त्वांमध्ये जिवंत आहे. धर्मनिरपेक्षतेसाठी त्यांचा आग्रह हा केवळ राजकीय नव्हता, तर सामाजिक एकतेसाठीही आवश्यक होता. नेहरूंच्या स्वप्नातील भारत हा एक असा देश होता की, जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मान, स्वातंत्र्य आणि समान संधी मिळेल. ही त्यांची विचारसरणी आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मितीचा पाया ठरली आहे. जिथे विविधतेत एकता हे प्रमुख तत्त्व आहे. जवाहरलाल नेहरूंची धर्मनिरपेक्षता हे केवळ एक राजकीय धोरण नव्हते, तर तो भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधणीसाठी आवश्यक असा दृष्टिकोन होता. त्यांनी आधुनिक, विज्ञानवादी आणि सर्वसमावेशक भारताचा पाया घातला. त्यांच्या धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आजही भारतीय लोकशाहीसाठी दिशादर्शक ठरते. अशा या दूरदर्शी नेत्याचे कार्य आणि विचार आधुनिक भारतासाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील. जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यात धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारी अनेक ठळक उदाहरणे जागोजागी सापडतील. त्यांनी भारताला धर्मनिरपेक्ष देश बनवण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर विविध निर्णय घेतले. त्यातील काही महत्त्वाची उदाहरणे पाहू या…

नेहरूंनी धर्मनिरपेक्षतेच्या विचाराला भारतीय संविधानाचा एक मूलभूत स्तंभ बनवले. त्यांनी सभेमध्ये संविधानात यावर जोर दिला की, भारताला कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नसावे, पण प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म पाळण्याचे, प्रचार करण्याचे आणि आचरण करण्याचे अधिकार संविधानात दिले गेले. कोणत्याही धर्माला राज्याचे अधिकृत समर्थन करता येणार नाही, ही नेहरूंची आग्रही भूमिका होती. नेहरूंनी हिंदू समाजातील महिलांना समानता मिळावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल लोकांना विश्वासात घेऊन टप्प्याटप्याने आणले. महिलांना संपत्तीतील हक्क, घटस्फोटाचा अधिकार आणि पुनर्विवाहाची संधी देणाऱया या कायद्याला नेहरूंनी सक्रियपणे पाठिंबा दिला. या कायद्याला विरोध करणाऱया रूढीवादी गटांना तोंड देऊन त्यांनी स्त्राr-पुरुष समानतेसाठी मोठे पाऊल उचलले.

स्वातंत्र्यानंतर भारतात झालेल्या धार्मिक दंगलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेहरूंनी कठोर पावले उचलली. दिल्लीतील धार्मिक दंगलींमध्ये हस्तक्षेप करून विभाजनाच्या वेळी झालेल्या दंगलीत त्यांनी स्वत दिल्लीत फिरून लोकांना शांतता आणि सलोख्याचे आवाहन केले. नेहरूंनी विभाजनामुळे विस्थापित झालेल्या हिंदू आणि मुस्लिम, दोघांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले. विभाजनानंतरच्या शरणार्थी शिबिरांमध्ये नेहरूंनी हिंदू आणि मुस्लिम, दोघांना समान मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले. कारण कोणत्याही धर्माचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे असे ते मानत होते. त्याच वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी धार्मिक तणाव कायम होता तरीही नेहरूंनी पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी कश्मीरला भारताचा भाग ठेवतानाही मुस्लिमबहुल समाजाच्या हितांचे रक्षण केले. त्यांनी भारतातील मुस्लिम नागरिकांवर विश्वास ठेवून त्यांना भारताच्या राजकीय प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.

जरी विरोधकांनी त्यांच्यावर मुस्लिमधार्जिणे असल्याचा आरोप केला तरीही नेहरूंनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि इतर मुस्लिम शिक्षण संस्थांना प्रोत्साहन दिले. मुस्लिम समाजात शिक्षणाची गती वाढावी यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. शिक्षण क्षेत्रातील अशा योगदानातून ते सर्व समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते. नेहरूंनी भारतात धर्मनिरपेक्ष शिक्षण प्रणालीचा पाया रचला. विज्ञानवादी दृष्टिकोन आणि सर्वधर्मसमभाव वाढावा यासाठी NCERT च्या शाळांमध्ये धर्मनिरपेक्ष शिक्षणावर भर दिला. तसेच सार्वजनिक शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक शिक्षणाला थारा दिला नाही.

जरी नेहरूंवर राजकीय दृष्टिकोनातून गोवधबंदी करावी यासाठी दबाव होता तरी नेहरूंनी गोवधबंदीला कडाडून विरोध केला. कारण त्यांच्या मते, गोवधबंदी हा धार्मिक विषय होता. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने गोवधबंदीने राज्याच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे त्यांचे मत होते. गोवधबंदीचा विचार हिंदूंच्या धार्मिक भावनांशी संबंधित असल्याने त्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष धोरणांचा भाग होऊ दिले नाही. त्याच वेळी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा प्रश्न धार्मिकदृष्टय़ा संवेदनशील होता. म्हणून नेहरूंनी स्पष्ट केले की, ही प्रक्रिया सरकारने नव्हे, तर खासगी निधीतून व्हायला हवी. त्यांनी धर्माचा राजकारणात उपयोग होऊ नये यासाठी अशी भूमिका घेतली होती. कारण संविधानानुसार भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे सरकारने कोणत्याच धर्मात ढवळाढवळ करता कामा नये, असे नेहरू मानत होते.

[email protected]

Comments are closed.