गुजरातच्या व्यापाऱ्यांमुळे कोल्हापूर, सांगलीतील गूळ उत्पादन बंद होण्याची वेळ, शेतकरी अडचणीत… बाजार समितीचा ढिसाळ कारभार
एकीकडे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गूळ तयार करताना रासायनिक रंग वापरू नका, अशी सूचना केली जाते, तर काही स्थानिक व्यापारी ‘आम्ही सांगू तसाच गूळ बनवा,’ अशी मागणी करत आहेत. याचा फटका गूळ उत्पादक शेतकऱयांना बसत आहे. गुळामध्ये केमिकल आणि भेसळ असल्याचे कारण देत गुजरातमधील ‘गूळ व्यापारी असोसिएशन’ने सोमवारपासून (दि. 12) ‘गूळ खरेदी बंद’चा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकऱयांकडून गूळ उत्पादनच बंद होण्याची वेळ आली आहे. गूळ उत्पादन आणि खरेदी-विक्री बंद झाल्यास कोटय़वधींची उलाढाल ठप्प होणार आहे. दरम्यान, शेतकरी अडचणीत आला असतानाही बाजार समितीचा ढिसाळ कारभार सुरूच आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होणाऱया गुळापैकी 90 टक्के गूळ हा गुजरातला पाठविला जातो. कोल्हापूर व सांगलीमधून झालेल्या पुरवठय़ामध्ये कलर, सल्फर व केमिकलयुक्त गूळ आढळल्याने गुजरातमधील अन्न व औषध प्रशासनाने गुजरातमधील व्यापाऱयांवर कारवाई केली आहे. त्यामुळे येथील जुना माधवपुरा व पाटण गूळ-साखर व्यापारी असोसिएशनने कोल्हापूर व सांगलीमधून गूळ खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, इकडे भेसळीमुळे कोल्हापूरचा गूळ बदनाम होत असूनही बाजार समिती आणि अन्न व औषध प्रशासनाची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. बाजार समितीत दिवसाला सुमारे 60 गाडय़ा गुळाची आवक होते. सौद्यांमधून दिवसाला सुमारे 60 लाख रुपये आर्थिक उलाढाल होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून सौदे बंद असल्याने सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे.
कलरचा वापर न करता तयार केलेला गूळ शुक्रवारी कोल्हापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱयाने खरेदी केला नाही. त्यामुळे जिह्यातील गूळ उत्पादक शेतकऱयांनी गूळ उत्पादनच बंद करण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीने सूचना केल्या त्यानुसार तयार केलेला गूळ व्यापारी खरेदी करत नाहीत. त्यामुळे गुळात कलरचा वापर करायचा की नाही, याबाबत समिती आणि व्यापाऱयांनी भूमिका स्पष्ट करावी. यानंतरच गूळ उत्पादन सुरू करण्याची भूमिका शेतकऱयांनी घेतली.
त्यामुळे कोल्हापुरी गूळ गुजरातच्या बाजारपेठेत जाणार की नाही? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. जिह्यातील गूळ उत्पादक शेतकऱयांनी सोमवारपासून बाजार समितीत गूळ पाठवायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱयांकडून बाजार समितीकडे होणारी आवक बंद राहणार आहे. आता गुजरातच्या निर्णयावरच कोल्हापूरची दिशा ठरणार आहे.
Comments are closed.