Jailer Asrani from 'Sholay' passes away

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे 84व्या वर्षी निधन : मुंबईमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

प्रतिनिधी/ मुंबई

शोले चित्रपटात जेलरची भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते आणि हास्यसम्राट अशी ओळख असणारे कलाकार गोवर्धन असरानी यांनी सोमवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी ते 84 वर्षांचे होते. असरानी यांना चार दिवसांपूर्वी फुफ्फुसात पाणी झाल्यामुळे जुहू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणीच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. असरानी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आहेत.

हास्यसम्राट असरानी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी जारी केली. सोमवारी सायंकाळीच सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. असरानी यांच्या इच्छेखातर त्यांच्या निधनाची माहिती सुरुवातीला कोणालाही देण्यात आली नाही. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर मृत्यूसंबंधीची माहिती माध्यमांना देण्यात आली. असरानी यांच्या निधनाची बातमी येण्याच्या काही तास आधी, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करण्यात आली होती. त्यात अभिनेत्याने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर काही तासांतच अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

400 हून अधिक चित्रपट, संस्मरणीय भूमिका

जयपूर येथे 1 जानेवारी 1941 रोजी जन्मलेल्या असरानी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर रेडिओ आर्टिस्ट म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1960 च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत ‘गुड्डी ’ या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख मिळवली. त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत आपली वेगळी छाप सोडली. ‘शोले’ चित्रपटातील त्यांची ‘अंग्रेजोंके जमाने का जेलर’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

असरानी यांनी 1960 च्या दशकात त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. असरानी यांनी बावर्ची, चुपके चुपके,  छोटी सी बात, भूल भुलैया, आणि खट्टा मीठा सारख्या चित्रपटांव्यतिरिक्त ‘शोले’मधील जेलरच्या भूमिकेसाठी त्यांची सर्वाधिक प्रशंसा झाली. 1967 मध्ये ‘हरे कांच की चुडियां’ या चित्रपटात अभिनेता विश्वजीतच्या मित्राची भूमिका साकारताना असरानी यांना चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक मिळाला.

 

Comments are closed.