जैशने दिल्लीत हा स्फोट घडवून आणला

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात दावा : महिला दहशतवाद्यांच्या भरतीवरून चिंता केली व्यक्त

वृत्तसंस्था/संयुक्त राष्ट्रसंघ

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यानजीक 9 नोव्हेंबर रोजी स्फोट झाला होता. या कारबॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. अशा स्थितीत आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादावर नजर ठेवणाऱ्या टीमच्या नव्या अहवालात या स्फोटामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे म्हटले गेले आहे. तसेच अहवालात या दहशतवादी संघटनेच्या नव्या कटांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून यात महिलांसाठी वेगळी शाखा निर्माण करणे आणि दहशतवादी कारवायांमधील त्यांचा सहभाग सामील आहे.

महिलांना दहशतवादी संघटनेत सामील केल्याने जैशचे नेटवर्क वाढू शकते आणि सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यास मदत मिळू शकते, असे तज्ञांचे मानणे आहे. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेला सोपविण्यात आलेल्या अहवालात अॅनालिटिकल सपोर्ट अँड सँक्शन्स मॉनिटरिंग टीमने 9 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या स्फोटाची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदकडून स्वीकारण्यात आल्याचे सांगितले आहे.

महिला शाखेमागील कुटिल हेतू

8 ऑक्टोबर रोजी जैशचा म्होरक्या मसूद अझहरने ‘जमात उल-मुमिनात’ नावाने महिलांसाठी एक वेगळी शाखा निर्माण करण्याची घोषणा केली. या शाखेचा उद्देश महिलांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करणे आहे. अशाप्रकारे महिलांना सामील करणे संघटनेच्या नव्या कटाचा हिस्सा असू शकतो, असे तज्ञांच sमानणे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका

जैश-ए-मोहम्मदला संयुक्त राष्ट्रसंघाने अल-कायदाशी निगडित दहशतवादी संघटना घोषित केले आहे. याचा म्होरक्या मसूद अझहरवर संयुक्त राष्ट्रसंघाकडून बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांदरम्यान जैशच्या वर्तमान स्थितीवरून मतमतांतरे आहेत. काही देश या दहशतवादी संघटनेला अद्याप सक्रीय अन् धोकादायक मानतात. तर एका सदस्य देशाने याला निष्क्रीय मानले आहे. या वेगवेगळ्या आकलनांमुळे दक्षिण आशियात दहशतवादविरोधी आंतरराष्ट्रीय सहकार्यात अडथळे येत आहेत.

मध्य अन् दक्षिण आशियात धोका

अहवालात मध्य आणि दक्षिण आशियातील दहशतवादी धोक्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अनेक कट्टरवादी संघटना क्षेत्रीय  अस्थिरता आणि सीमापार नेटवर्कचा फायदा उचलत आहेत. सातत्याने दबावानंतरही जैशसारखी दहशतवादी संघटना नव्या पद्धती अवलंबून स्वत:ला पुन्हा संघटित करणे आणि मोठा हल्ला करण्याची क्षमता दाखवत आहेत, असे अहवालात म्हटले गेले आहे. काही दहशतवादी संघटना कमकुवत झाल्या तरीही त्यांची नवा कट आणि प्रतिकात्मक ठिकाणांना लक्ष्य करण्याची क्षमता अद्याप क्षेत्रीय आणि जागतिक सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरली असल्याचे या अहवालामुळे स्पष्ट होते.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात काय?

  • 9 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यानजीक झालेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला होता.
  • पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या हल्ल्याशी संबंधित असल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या पथकाचा दावा.
  • जैश-ए-मोहम्मदने 8 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी ‘जमात उल-मुमिनात’ नावाची शाखा निर्माण केली, याचा उद्देश दहशतवादी कारवायांमध्ये महिलांना सामील करणे आहे.
  • जैश आता नवी भरती आणि संचालन मॉडेल अवलंबित आहे, महिलांना सहाय्यक अन् सक्रीय भूमिकांमध्ये सामील करत सुरक्षा यंत्रणांपासून वाचण्याचा प्रयत्न.
  • जैश-ए-मोहम्मद 2000 साली अस्तित्वात आली, मुख्यकरून भारत, विशेषकरून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया, अनेक हायप्रोफाइल हल्ल्यांसाठी जबाबदार.
  • जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरवर संयुक्त राष्ट्रसंघाकडून प्रवासबंदी आणि संपत्ती जप्त करण्यासारखे निर्बंध लादण्यात आले आहेत.

Comments are closed.