जयशंकर यांनी इस्रायलच्या मंत्र्यांशी चर्चा केली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिडॉन सार हे सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांची भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाली आहे. इस्रायलचे नेते बेंजामिन नेत्यान्याहू हे देखील नजीकच्या भविष्यकाळात भारताचा दौरा करणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे सार यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत इस्रायलयच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा हा दौरा होत असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भारत आणि इस्रायल यांच्यात धोरणात्मक भागीदारी आहे. इस्रायल हा भारताचा मोठा संरक्षण साधन पुरवठादार देश आहे. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश अत्यंत कठीण परिस्थिती असतानाही एकमेकांच्या समवेत राहिले आहेत. सध्याच्या परिस्थितीतही आम्ही एकमेकांना सहकार्य करीत आहोत. इस्रायल आणि हमास यांच्यात अमेरिकेच्या पुढाकाराने झालेल्या शस्त्रसंधीचे भारताने स्वागत केले आहे. ही शस्त्रसंधी प्रदीर्घ काळ टिकावी, अशी भारताची इच्छा आहे. आम्हीही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन जयशंकर यांनी या चर्चेनंतर केले आहे.
नेतान्याहू यांच्या दौऱ्यासंबंधी उत्सुकता
इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू हे येत्या एक दोन महिन्यांमध्ये भारताच्या दौऱ्यावर येतील, अशी शक्यता आहे. सार यांचा हा दौरा या दौऱ्याची वातावरण निर्मिती करण्यासाठीच आयोजित करण्यात आला आहे, अशी चर्चा आहे. नेतान्याहू यांच्या संभाव्य दौऱ्पात भारत आणि इस्रायल यांच्यात अनेक महत्वाचे संरक्षणविषयक आणि आर्थिक करार होतील, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
Comments are closed.