जयशंकर यांनी प्रथमच तालिबान सरकारशी चर्चा केली

जुने मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याचे प्रयत्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी रात्री अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्रमंत्री मवलावी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा केली. भारत आणि अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनामधील ही पहिलीच मंत्रीस्तरीय चर्चा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल जयशंकर यांनी मुत्ताकी यांचे आभार मानले. या संभाषणात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांचाही उल्लेख करण्यात आला. भारताने अफगाणिस्तानवरही क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा अलिकडेच पाकिस्तानी लष्कराने केला होता. मात्र, भारताने हा दावा पूर्णपणे नाकारला होता.

भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केल्याचा पाकिस्तानचा आरोप अफगाणिस्तानने फेटाळून लावला होता. जयशंकर यांनी याबद्दल अफगाण सरकारचे आभारही मानले. जयशंकर म्हणाले की, भारत आणि अफगाणिस्तानमधील जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांचा पुनरुच्चार करण्यात आला आणि भविष्यात ते कसे पुढे न्यायचे यावर चर्चा झाली. तसेच तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताकडे अफगाण व्यापारी आणि रुग्णांसाठी भारतीय व्हिसा सुलभ करण्याची मागणी केली. याशिवाय, त्यांनी भारतात असलेल्या अफगाण कैद्यांची सुटका करून त्यांना मायदेशी पाठवण्याचे आवाहनही केले. जयशंकर यांनी या समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. अफगाणिस्तानात तालिबानच्या प्रवेशानंतर भारताने 25 ऑगस्ट 2021 रोजी तात्काळ व्हिसा देणे बंद केले. तालिबान सत्तेत आल्यानंतर तेथील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.

मिस्री-मुत्ताकी यांच्या भेटीने चर्चेला प्रारंभ

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर जानेवारीमध्ये भारत आणि तालिबान सरकारमध्ये चर्चा सुरू झाली. जानेवारीमध्ये दुबईमध्ये विक्रम मिस्री आणि मुत्ताकी यांच्यात एक बैठक झाली. अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तेव्हा अफगाणिस्तानातील लोकांशी जोडल्याबद्दल आणि त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय नेतृत्वाचे कौतुक केले होते. यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव आनंद प्रकाश यांनी 28 एप्रिल रोजी मुत्ताकी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. आता एस जयशंकर आणि मुत्ताकी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे.

भारताने अद्याप तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही, परंतु गेल्या 20 वर्षांत त्यांनी अफगाणिस्तानला 20,000 कोटी रुपयांची मदत केली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये तालिबानने मुंबईतील अफगाण वाणिज्य दूतावासात आपल्या राजदूताची नियुक्ती केली. रशिया, चीन, तुर्की, इराण आणि उझबेकिस्तानमध्ये आधीच अफगाणिस्तानचे दूतावास आहेत. भारत गेल्या काही काळापासून अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता न देता त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे सरसावताना दिसत आहे.

Comments are closed.