जयशंकर यांनी युरोपियन देशांवर टीका केली
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दहशतवादावर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करशहांना पाठबळ देण्याच्या युरोपियन देशांच्या परंपरेवर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी टीका केली आहे. सध्या जयशंकर हे युरोपच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी यांनी जर्मनीचे चान्सेलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा समाधानकारक आणि सकारात्मक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर्मनीने भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
तथापि, गेल्या 80 वर्षांमध्ये युरोपातील प्रमुख देशांनी पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या लोकशाही हननाच्या घटनांकडे दुर्लक्ष केले आहे. युरोपातील देश लोकशाही पद्धतीने चालतात. तथापि, ते पाकिस्तानमधील हुकुमशहा लष्करी प्रशासकांचेही समर्थन करतात. पाकिस्तानातील लष्करी हुकुमशहा दहशवादाला प्रोत्साहन देतात. अशा शासकांना युरोपचा पाठिंबा मिळत असल्याने दहशतवादाला बळ मिळत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन जयशंकर यांनी केले. युरोपच्या दौऱ्यात त्यांनी आतापर्यंत नेदरलंडस् आणि डेन्मार्क या देशांचा दौरा केला असून सध्या ते जर्मनीत आहेत.
ही भूमिका दुटप्पी
एकीकडे लोकशाहीचे समर्थन करायचे आणि त्याचवेळी पाकिस्तानातील लष्करशहांना पाठीशी घालायचे अशी दुटप्पी भूमिका युरोपियन राष्ट्रांनी आतापर्यंत नेहमीच घेतली आहे. पाकिस्तानच्या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीला युरोपियन देशांनी आजवर जितका पाठिंबा दिला आहे, तितका कोणीही दिलेला नाही. भारताने नेहमीच पाकिस्ताला दहशतवादाच्या संदर्भात उघडे केले आहे. पाकिस्तानातील राजवटी दहशतवादाचे पोषण कसे करतात, याचे अनेक पुरावेही आम्ही जगासमोर सातत्याने मांडले आहेत. मात्र, लोकशाहीवादी असणाऱ्या युरोपियन देशांनी पाकिस्तानला पाठबळ दिले आहे, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या समर्थनाची परंपरा
1947 पासून युरोप आणि अमेरिकेने पाकिस्तानला समर्थन दिले आहे. दहशतवादाला असणारा पाकिस्तानचा पाठिंबा माहीत असूनही 2004 मध्ये पाकिस्तानला मेजर नॉन नाटो अलाय अस दर्जा देण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानला महत्वाचा सामरिक आणि आर्थिक लाभ घेता आला. त्यानंतर 2011 मध्ये अल कायदाचा म्होरक्या ओसाम बिन लादेन हा पाकिस्तानच्याच आश्रयाला असल्याचे दिसून आले. याच अल् कायदा संघटनेने 2001 मध्ये अमेरिकेत भीषण दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. अमेरिकेचा व्यापारी मानबिंदू असणारी आस्थापने या हल्ल्यात कोसळली होती. या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानाप सापडला असूनही तरीही अमेरिकेने पाकिस्तानचे समर्थन थांबवलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानसंबंधी पाश्चिमात्य देशांची भूमिका संभ्रमित करणारी असून या भूमिकेमागचे कारण अस्पष्ट आहे, असे अनेक तज्ञांचेही मत आहे.
Comments are closed.