जयशंकरचा बांगलादेशचा अल्टिमेटम
‘तुम्हाला कोणत्या प्रकारचे नाते हवे आहे… ते तुम्हीच ठरवा‘ असे निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेख हसीना देश सोडून गेल्यापासून आणि मुहम्मद युनूस सत्तेत आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल भारताने वेळोवेळी कडक भूमिका घेतली आहे. त्याचवेळी बांगलादेशचे अंतरिम सरकार भारतासोबतचे संबंध बिघडवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. बांगलादेशच्या या आडमुठेपणाबद्दल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आहे.
अलिकडेच ओमानमध्ये, भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट घेतली. पण बांगलादेशमध्ये सुधारणा होताना दिसत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या बैठकीनंतर जवळजवळ एक आठवड्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशच्या शत्रुत्वपूर्ण वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला.
दुहेरी मानके चालणार नाहीत!
परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, बांगलादेशला आपल्याशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवायचे आहेत हे ठरवावे लागेल. 1971 पासून सुरू झालेला बांगलादेशचा आपला एक मोठा आणि खास इतिहास असतानाही त्यांना एकीकडे भारताशी चांगले संबंध हवे आहेत आणि दुसरीकडे ते तिथे घडणाऱ्या देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देत राहतात. अंतरिम सरकारमधील कोणीही दररोज उभे राहून प्रत्येक गोष्टीसाठी भारताला दोष देऊ शकत नाही. बांगलादेशला यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.
द्विपक्षीय संबंधांमधील समस्यांमागे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे अल्पसंख्याकांविरुद्ध होणारा जातीय हिंसाचार. बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचारात वाढ झाली आहे. त्याचा आपल्या विचारसरणीवर निश्चितच परिणाम झाला आहे. त्याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे बांगलादेशचे राजकारण. आता त्यांना भारताशी कोणत्या प्रकारचे नाते ठेवायचे आहे हे त्यांनाच ठरवावे लागेल, असे जयशंकर म्हणाले.
Comments are closed.