धक्कादायक! निवासी आश्रमशाळेत 8 वर्षीय चिमुकल्याचा खून,अल्पवयीन मुलांनीच ठार मारलं; सर्वत्र खळबळ

जालना : काही दिवसांपूर्वी एका शाळेत (School) विद्यार्थ्याचा त्याच शाळेतील विद्यार्थ्यांकडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, आता जालन्यातूनही (Jalana) अशीच खळबळजनक घटना समोर आली आहे. किरकोळवादातून निवासी आश्रम शाळेतील 8 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणातील दोन विधी संघर्ष बालक भोकरदन पोलिसांच्या (Police) ताब्यात आहेत. तर, ही आश्रमशाळा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जालना जिल्ह्यात भोकरदन येथील गणपती विद्यालय निवासी आश्रम शाळेच्या वसतिगृहामध्ये किरकोळ वादातून एका 8 वर्षीय विद्यार्थ्यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बालवीर पवार असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास किरकोळ वादातून वसतिगृहात सोबत राहणाऱ्या  8 वर्षीय आणि 13 वर्षीय दोन दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी या 8 वर्षीय विद्यार्थी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतल असून या दोघांनी या हत्येची कबुली दिल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. दरम्यान, खेळताना झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिस अधीक तपास करत आहेत.

भोकरदन येथील या अल्पवयीन हत्याप्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली असून चिमुकल्या मुलाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. तर, मृत बालवीरच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

हेही वाचा

हेडफोन घालून रुळ ओलांडताना महिलेचा मृत्यू, वाचवायला गेलेला युवकही ठार; आई-वडिलांचा आधार गेला

आणखी वाचा

Comments are closed.