माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना; महाराष्ट्रातील कुटुंबाला जिवंत कालव्यात फेकले; आई-वडिलांसह मुलीचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता!; पाईपचा आधार घेत 13 वर्षीय मुलाने वाचवला जीव – TMarathiNews

सुरत: गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका कुटुंबाला चार अनोळखी व्यक्तींनी कारमधून बाहेर काढून जिवंतपणे कालव्यात फेकल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेत आई-वडिलांसह एका मुलीचा मृत्यू झाला असून, 13 वर्षीय मुलगा चमत्कारिकरीत्या बचावला आहे. कुटुंबातील अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असलेले हे कुटुंब एरंडोल येथील एका कारखान्यात काम करत होते. 21 तारखेला मजुरीच्या कामासाठी हे कुटुंब कारने सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान त्यांची कार गुजरातमधील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळील कालव्याच्या परिसरात पोहोचली.

यावेळी दुसऱ्या एका कारमधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला अडवले. त्यानंतर या व्यक्तींनी कुटुंबातील सदस्यांना कारमधून जबरदस्तीने बाहेर काढले आणि कालव्याच्या खोल पाण्यात फेकल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबातील सदस्यांना स्वतःचा जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही.

पाईपचा आधार घेत मुलाने वाचवला जीव

कालव्याच्या पाण्यात फेकण्यात आलेल्या कुटुंबातील 13 वर्षीय मुलाच्या हाताला पाण्यात एक पाईप लागला. त्याने प्रसंगावधान राखत त्या पाईपचा आधार घेतला आणि पाण्याबाहेर येण्यात यश मिळवले. मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या या मुलाने जवळच्या एका हॉटेलमध्ये धाव घेतली. तेथे त्याने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

तिघांचे मृतदेह आढळले; दोघांचा शोध सुरू

या घटनेत आई-वडील आणि एका मुलीचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याची माहिती आहे. तर 13 वर्षीय मुलगा बचावला असून, कुटुंबातील अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे या घटनेतील मृतांची आणि बेपत्ता व्यक्तींची संख्या लक्षात घेता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

चार अनोळखी व्यक्तींनी नेमक्या कोणत्या कारणातून या कुटुंबाला लक्ष्य केले? हा प्रकार पूर्वनियोजित होता का? कुटुंबाची कार अडवण्यामागे नेमका काय उद्देश होता? तसेच बेपत्ता असलेल्या दोन मुलांचे काय झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, बचावलेल्या 13 वर्षीय मुलाकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. बेपत्ता मुलांचा शोध आणि या कथित हल्ल्यामागील आरोपींचा शोध घेणे, याला पोलिसांनी प्राधान्य दिले आहे.

महाराष्ट्रातील एका कुटुंबावर गुजरातमध्ये ओढवलेल्या या भीषण संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण प्रकरणाचे गूढ उकलण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.