एसटी बस दरीत कोसळता कोसळता वाचली, खिडक्यांतून उडय़ा मारून प्रवाशांनी वाचवला जीव
जळगाव जिह्यातील कन्नड घाटात छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा रविवारी भीषण अपघात झाला. स्टिअरिंग रॉड तुटल्याने अथवा स्टिअरिंग जॅम झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच बस घाटातील संरक्षक कठडय़ाला धडकली. धडकेनंतर बस कठडय़ावरच अडकून राहिल्याने मोठा धोका टळला. बसमध्ये 59 प्रवासी होते. सर्व प्रवासी बचावले असून चार जण किरकोळ जखमी झाले.
अपघाताच्या क्षणी बसमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. बस दरीच्या दिशेने झुकल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचविण्यासाठी खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. एकामागोमाग एक प्रवासी बसमधून बाहेर पडले. काही वेळातच अनेक प्रवासी सुरक्षितपणे बाहेर आले. या थरारक प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी अक्षरशः सुटकेचा निःश्वास सोडला.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून स्टिअरिंग रॉड तुटणे किंवा स्टिअरिंग जॅम होणे, या तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Comments are closed.